सत्ता गेल्यानंतरचे शहाणपण


पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे खुर्चीवर असताना भारत द्वेषातून कारभार करतात आणि त्यांच्या हातातून सत्ता जाते तेव्हा मात्र शहाण्यासारखे बोलतात. पूर्वी ते पंतप्रधान असताना कारगिल युद्ध झाले आणि त्यात पाकिस्तानला नामुष्की पत्करावी लागली. या युद्धाबाबत ते पदावर असेपर्यंत काही बोलले नाहीत पण हातून सत्ता गेल्यानंतर ते खरे बोलले आणि कारगिलचे आक्रमण ही आपल्या देशाची चूक होती असे प्रतिपादन केले. अर्थात त्यांनी या आक्रमणाचे आणि नंतर झालेल्या पराभवाचे खापर लष्करावर फोडले. तेव्हा परवेज मुशर्रफ हे लष्कर प्रमुख होेते त्यांना शरीफ यांनी जबाबदार धरले. आताही त्यांना पाकिस्तानातल्या सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात बडतर्फ केल्यामुळे ते पदावर नाहीत आणि म्हणूनच शहाण्यासारखे बोलायला लागले आहेत.

२००८ साली मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला पाकिस्तान सरकारच्याच पाठींब्याने झाला असल्याची कबुली त्यांनी आता दिली आहे. आताही हे सत्य त्यांनी पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर जाहीरपणाने स्वीकारले आहे. त्यांनी पाकिस्तानातल्याच डॉन या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ही गोष्ट मान्य केली आहे. खरे तर हा हल्ला पाकिस्ताननेच केला होता हे काही कोणी सांगायची गरज राहिलेली नाही. सगळ्या जगाला ही गोष्ट माहीत झाली आहे. हा हल्ला करणार्‍या दहापैकी ९ अतिरेक्यांना मुंबई पोलिसांनी ठार केले पण दहावा दहशतवादी अजमल कसाब हा जिवंत सापडला आणि त्याच्या ओळखीवरून सगळ्या कारस्थानावर प्रकाश पडला.

या हल्ल्याचा सूत्रधार हाफिझ सईद याच्यावर खटला भरावा असा दबाव भारताने आणला म्हणून पाकिस्तान सरकारने लाजेकाजेस्तव खटला भरला पण यथावकाश तो रेंगाळून थांबवलाही. यातूनही पाकिस्तान सरकारच्या या हल्ल्यातल्या सहभागाची वस्तुस्थिती जगाला कळली आहे. तेव्हा नवाज शरीफ यांनी कबुली दिली म्हणून काही वेगळे घडलेले नाही. पण पाकिस्तानच्या या पापाला अधिकृततता आली आहे. नवाज शरीफ यांना ही उपरतीही काही उगाच झालेली नाही. पाकिस्तान आपल्या या कारवायांमुळे जगाच्या राजकारणात एकाकी पडला आहे. अगदी चीननेही पाकिस्तानच्या पापात सहभागी होण्याचे अनेकदा नाकारले आहे. अमेरिकेलाही पाकिस्तानचे अंतरंग कळले आहे. या एकाकी पडण्याने तिथल्या राजकीय पक्षांत पश्‍चात्तापाची लहर उसळली आहे. त्यातून ही कबुली पुढे आली आहे.