हृदयरोपणात १० पट वाढ


भारतात अवयवदान आणि त्याचे रोपण यात काही तरी समन्वय असावा यासाठी प्रयत्न सुरू झाल्यानंतर हृदयरोपणाच्या शस्त्रक्रियांत १० पट वाढ झाली आहे. भारतात अवयवदानाच्या शस्त्रक्रिया १९९४ साली सुरू झाल्या. तेव्हापासून २०१५ पर्यंत पूर्ण देशात हृदयरोपणाच्या ३५० शस्त्रक्रिया झाल्या होत्या. २०१४ साली यासाठी विशेष प्रयत्न सुरू झाले आणि अवयवदान संघटना स्थापन करण्यात आली. तेव्हापासूनच्या दोन वर्षातच देशात हृदयरोपणाच्या ३०० शस्त्रक़्रिया झाल्या आहेत. म्हणजे पूर्वीच्या २१ वर्षात जेवढ्या शस्त्रक्रिया झाल्या तेवढ्या शस्त्रक्रिया केवळ दोन वर्षात झाल्या आहेत. त्याचबरोबर यकृत आणि मूत्रपिंडांच्या रोपणाचेही प्रमाण वाढले आहे.

मेंदूमृत रुग्णाचे अवयव दानात मिळवणे आधी आवश्यक असते. त्यासाठी अशा रुग्णाच्या नातेवाईकांचे प्रबोधन करावे लागते. या संघटनेने त्यासाठी देशभरात १३०० समुपदेशकांना प्रशिक्षण देऊन तयार केले आहे. शिवाय अवयवदान झाल्यावर ते अवयव काढून घेण्याच्या सोयी असलेल्या आणि त्यांचे रोपण करण्याची सोय असलेल्या रुग्णालयांची संख्याही वाढवली पाहिजे. त्याही दिशेने प्रयत्न झाले असल्याने अवयवप्राप्त होण्याचेही प्रमाण वाढले आहे आणि ते रोपित करण्याचेही प्रमाण वाढले आहे. असे असले तरीही अशा अवयवांची आणि त्यातल्या त्यात हृदयांची कितीतरी मोठी मागणी आहे. ज्या केन्द्रांवर रोपणाची सोय आहे त्यावर सरासरी १० ते २० रुग्णांची मागणीची प्रतीक्षा यादी तयार आहे. त्या हिशेबाने असे म्हणता येते की सध्या ३०० हृदये मिळत आहेत आणि ५० हजारापेक्षाही अधिक हृदयांची गरज आहे.

किडनी आणि यकृतांचे रोपण शक्य होते. त्यासाठी हे अवयव प्राप्त करणारे रुग्णालय आणि रोपण करणारे रुग्णालय यांच्यात त्या अवयवाची वाहतूक शीघ्रतेने करावी लागते. त्यासाठी ग्रीन कारिडॉर निर्माण करावा लागतो. तसा तो केला जातो आणि त्यामुळे अनेक ठिकाणी हे अवयव वेळेत पोचवून रोपित केले जातात. पण हृदयाची स्थिती फार वेगळी असते. ते रोपित करणारी केन्द्रे कमी आहेत आणि प्राप्त झालेले ़हृदय फार लवकर तिथपर्यंत न्यावे लागते. शक्यतो हवाई मार्गानेच ते न्यावे लागते. अशा प्रकरणात त्यासाठी येणारा खर्च हृदय हवे असलेल्या रुग्णाला करावा लागतो. त्याला चार्टर प्लेनचा खर्च परवडत नसेल तर प्राप्त झालेले हृदय वाया जाते. तेव्हा याही बाबतीत काही तरी केले जाणे आवश्यक आहे.

Leave a Comment