दुर्दैवी आत्महत्या


महाराष्ट्र पोलीस दलातले ज्येष्ठ अधिकारी हिमांशु रॉय यांनी आपल्या राहत्या घरात स्वत:च्याच हाताने गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त मोठे धक्कादायक आहे. तीन वर्षांपूर्वी ठाण्यातल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने एका हॉटेलात आपल्या पत्नीच्या उपस्थितीत आत्महत्या केली होती. ती आत्महत्या खळबळजनक तर ठरली होतीच पण तिच्यामागचे कारण केवळ घरगुती होते. पती आणि पत्नी यांच्यात बेबनाव होता. दोघांनीही भांडणाचा मुद्दा हा अहंकाराचा मुद्दा केलेला होता आणि हॉटेलात जेवता जेवता त्याने स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या होत्या. पोलीस अधिकारी शूर असतात, विचारी असतात आणि मनाने खंबीर असतात. म्हणूनच त्यांनी आपल्या जीवनाचा शेवट केवळ काही मानसिक कारणांनी करावा याचे नवल वाटल्याशिवाय रहात नाही.

हिमांशु राय यांच्या आत्महत्येमागचे आता माहीत झालेले कारण मात्र वेगळे आहे. त्यांना कर्करोगाने त्रस्त केले होते आणि ते त्यामुळे आजारपणाच्या रजेवर होते. ही रजा प्रदीर्घ काळची होती. महाराष्ट्रात दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून काम केलेला अधिकारी घरात असा एखाद्या असाध्य आजाराने जर्जर होऊन पडतो तेव्हा त्याची अवस्था काय होत असेल याची कल्पनाही करता येणार नाही. असे लोक निरोगी असतानाही निवृत्त होतात तेव्हा आता आपल्या मोकळ्या वेळेचे काय करावे या कल्पनेनेच अस्वस्थ होतात मग राय यांना तर कर्करोगाने ग्रासले होते आणि तो आता दुरुस्त होणार नाही अशा स्थितीला आलेला होता. समाजाने आपले गणवेषातले रुबाबदार रूप पाहिलेले आहे. त्या समाजासमोर आता गणवेषा शिवाय आणि रुग्णाईत अवस्थेत यावे लागणार म्हणून ते अस्वस्थ होते.

याच मन:स्थितीत त्यांनी आपल्या तोेंडात गोळी मारूऩ घेतली. त्यांचा शेवट असा व्हावा याचा सर्वांनाच खेद वाटेल कारण त्यांनी पोलीस दलात अशी कामगिरी बजावलेली होती की जिचा अभिमान सार्‍या महाराष्ट्राला वाटत होता. त्यांनी नामवंत मल्ला दारासिंग याच्या मुलाला कोणाचीही भीड न बाळगता अटक केली होती. शिवाय कसाबला फाशी देण्याची कारवायी त्यांनी केली होती. विशेष म्हणजे मुंबई बॉंबस्फोट प्रकरणातल्या आरोपींना शिक्षेपर्यंत नेणारा किचकट तपासही त्यांनी केला होता. ज्यांना हायप्रोफाईल केसेस म्हटले जाते अशा प्रकरणांचा अतीशय किचकट तपासही त्यांनी केला होता आणि मोठ्या आरोपींना खडी फोडायला पाठवण्यात मोठा वाटा उचलला होता.