योगासाठी कशा प्रकारची ‘मॅट’ वापरणे चांगले?


योगासने करताना मोजे घालावेत किंवा नाही, किंवा योगासने करताना मॅट किंवा चटई कशा प्रकारची असावी, ह्याबाद्ल नव्याने योग करणाऱ्यांच्या मनामध्ये शंका असते. ह्यावर योगमहर्षी श्री जग्गी वासुदेव, म्हणजेच सद्गुरू ह्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार योगसाधना करताना मोजे घालण्याची आवश्यकता नसते. किंबहुना ज्या व्यक्ती ‘हठ योग’ करीत असतात, त्यांच्या शरीरामध्ये इतकी उष्णता निर्माण होते, की थंड हवेच्या प्रदेशांमध्ये राहत असून ही त्यांना थंडी वाजत नाही.

हठ योगातील अनेक स्थिती किंवा आसने अशी आहेत, जी केल्याने शरीरातील विविध अवयवांना स्पर्श केला जातो. त्यामुळे योगासनांच्या द्वारे निर्माण झालेल्या ऊर्जेचे संचरण संपूर्ण शरीरामध्ये होत असते. काही योगासने करताना पावले, टाचा, पायांचे अंगठे ह्यांना स्पर्श होतो. जर पायामध्ये मोजे घातलेले असतील, तर ह्या ठिकाणी ऊर्जेचे संचरण होण्यात अडथळे येऊ शकतात. योग म्हणजे धरित्रीशी एकरूप होण्याची साधना. त्यामुळे योग करताना तुम्ही कशा प्रकारची मॅट वापरता ह्याचे ही विशेष महत्व असल्याचे सद्गुरू सांगतात.

आपण करीत असलेल्या योगसाधनेचे, विशेषतः हठ योगाचे उत्तम लाभ शरीराला मिळावेत ह्याकरिता सारविलेल्या मातीच्या जमिनीवर योगासने करणे सर्वोत्तम मानले गेले आहे. त्यावर रेशमी किंवा शुद्ध सुती कपडा अंथरून त्यावर योगासने केली जावीत असे सद्गुरू म्हणतात. आपले शरीर ह्या सृष्टीचाच एक भाग असून, योगसाधना करताना सृष्टीशी एकरूप होणे हे आपले ध्येय असते. तसेच धरतीमधून आपल्या शरीरामध्ये अवशोषित होणारी सकारात्मक ऊर्जा आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असते. ह्या सकारत्मक उर्जेने अनेक आजार होण्याचा धोका टळत असल्याचे सद्गुरू सांगतात.

आजकाल योगासने करण्यासाठी बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या मॅट रबरने बनलेल्या असतात. अनेकदा सुती सतरंज्या वापरणे चांगले हे माहित असूनही सुती सतरंज्या लवकर खराब होतात, किंवा मळतात म्हणून त्या न वापरता रबरने बनविलेल्या मॅट वापरण्याकडे लोकांचा अधिक कल दिसून येतो. पण खरे तर रबर हे ‘इंस्युलेटर’ असल्याने, म्हणजेच प्रवाह-रोधक असल्याने, ह्यावर बसून योगासाने केल्याने धरतीकडून आपल्याला मिळत असलेली सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये अवशोषित होऊ शकत नाही. ह्याकरिता नैसर्गिक, जैविक पद्धतीने तयार केलेल्या पदार्थांपासून बनविले गेलेले कापड, म्हणजेच रेशमी किंवा सुती कपडा योगासने करण्यासाठी अंथरला जायला हवा, असे सद्गुरू सांगतात.