विपरीत आतिथ्य


जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे काही दिवसांपूर्वी इस्रायलच्या दौर्‍यावर गेले होते. त्यांच्या त्या दौर्‍यातील एक विचित्र घटना आता प्रकाशात आली आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी ऍबे यांना आपल्या घरी मेजवानीला बोलावले. तिथे पाहुण्यांचे स्वागत आणि जेवण तर खासच झाले. जेवणाच्या शेवटी आइस्क्रिम आले. त्या आइस्क्रिमने पाहुण्यांचे तोंड गोड व्हावे अशी अपेक्षा असली तरीही त्यांचे चेहरे आंबट झाले कारण ते आइस्क्रिम कितीही चांगले असले तरीही ते ज्या पात्रातून दिले होते ते पात्र बुटाच्या आकाराचे होते. जपानी लोक तर उपचारांच्या बाबतीत फार आग्रही असतात. अशा देशाच्या पंतप्रधानांना बुटात आइस्क्रिम देण्याने त्यांचा घोर अपमान झालाय असे त्यांना वाटत असल्यास त्यात नाही नवल नाही.

जपानच्या राजनैतिक अधिकार्‍याने या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. जपानमध्ये बुटाला सर्वात अपवित्र समजले जाते. घरात जाताना तर आपणही बूट बाहेर काढतो पण जपानी लोक आपल्या कार्यालयातही बूट वापरत नाहीत. तेव्हा हा प्रकार मोठाच चमत्कारिक ठरला. इस्रायलच्या पंतप्रधानांनी या प्रकारावर काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही पण त्यांच्या कार्यालयाने काही प्रमाणात सारवासारवी केली. आमचा आचारी जरा जादा उत्साही आहे आणि त्याच्या अतिउत्साहीपणातून हा प्रकार घडला आहे. त्यामागे पाहुण्यांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता आणि तसे करण्याचे काही कारणही नाही असे पंतप्रधानांच्या कार्यालयानेही म्हटले. एखाद्या वस्तूला बुटाचा आकार दिला म्हणून ती वस्तू काही बूट होत नाही असे पंतप्रधान कार्यालयाचे म्हणणे होते.

खरे तर इस्रायल हा काही सामान्य देश नाही. कडक शिस्तीचा देश आहे. एरवीही कोणत्याही देशात परदेशी पाहुणे आल्यानंतर त्यांच्या स्वागताबाबत आणि राज शिष्टाचाराबाबत अगदी लहान सहान गोष्टीतही दक्षता घेतली जात असते. पाहुण्यांना जेवणात कोणते पदार्थ दिले जाणार आहेत. त्यांच्यासोबत जेवायला कोणाकोणाला पाचारण केले जाणार आहे याची काटेकोर आखणी केली जात असते. त्यांच्या मिनिटा मिनिटाच्या कार्यक्रमाची योजना केली जात असते. अशा स्थितीत पाहुण्यांना दिले जाणारे आइस्क्रिम कोणते आहे आणि ते कशात दिले जाणार आहे याची तपासणी झाली नसण्याची शक्यता फार कमी आहे. या बुटामागे काही तरी योजना असलीच पाहिजे अर्थात ती योजना काय होती यावर राजकीय विश्‍लेषकच प्रकाश टाकू शकतील.

Leave a Comment