जगाच्या दीर्घ सफरीवर निघाले नॉर्वेचे वायकिंग सन क्रुझ


नॉर्वेचे वायकिंग सन क्रुझ जगाच्या सफरीवर निघण्यासाठी सज्ज झाले असून हा २४५ दिवसांचा प्रवास येत्या ऑगस्ट मध्ये ग्रीनविच पासून सुरु होणार आहे आणि तो ग्रीनलंड मध्ये संपणार आहे. या प्रवासात हे क्रुझ ११३ बंदरे आणि ५९ देश फिरणार असून त्यात ९३० प्रवासी असतील. या प्रवासासाठी एका प्रवाशाचे कमीत कमी भाडे ६० लाख रु. आहे. अंटार्टिका सोडून बहुतेक सर्व खंडातून या क्रुझचा प्रवास होणार आहे.


या क्रुझवर प्रवाशांना शास्त्रीय संगीत बँड, इतिहास, कला, कुकरीवर लेक्चर ऐकता येतील तसेच जगाच्या कानाकोपऱ्यातील विविध पदार्थांचा आस्वाद घेता येईल. त्यासाठी ८ प्रकारची रेस्टोरंट आहेत. दोन पूल असून तेथून थेट समुद्र दर्शन होणार आहे. थर्मल स्पा, स्नो ग्रॅटो याची मजाही लुटता येईल. क्रुझ वर पाच प्रकारच्या रूम्स असून सर्वात छोटी २७० चौरस फुटाची आहे. कपल साठी १ कोटी २१ लाख रुपये भरावे लागतील तर स्यूट साठी प्रती प्रवासी १ कोटी ७६ लाख भरावे लागणार आहेत. क्रुझचे सर्व बुकिंग फुल झाले आहे.

या कृझने यापूर्वीही प्रवास केला आहे मात्र आत्ताचा प्रवास त्यावेळेपेक्षा दुप्पट अंतराचा आहे. प्रवासी सामान पॅक अनपॅक न करता प्रवासाचे सुख उपभोगू शकणार आहेत.

Leave a Comment