धक्का तंत्र मराठवाड्यातले


दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा आणि पुतणे धनंजय मुंडे या दोघांचा राजकारणात उभा दावा आहे. एकाच कुटुंबात लहानाची मोठी झालेली ही भावंडे कधी कधी भावूक होतात आणि सारे राजकीय वैर विसरून बहीण भावासारखे वागतात. गेल्याच आठवड्यात धनंजय मुंडे यांना कसलासा पुरस्कार मिळाला. या पुरस्कार प्रदान कार्यक्रमाला पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर या दोघांनी परस्परांना आलिंगन देऊन प्रेमाचे प्रदर्शन केले. पण लातूर-बीड-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे दोघेही ते प्रेम पुन्हा विसरले असून एकमेकांना राजकीय धक्के द्यायला लागले आहेत.

हा मतदारसंघ कॉंग्रेसकडे होता. पण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात वाटाघाटी होऊन तो कॉंग्रेसने सोडला आणि राष्ट्रवादीला दिला. वास्तविक या मतदारसंघात राष्ट्रवादीला बहुमत मिळण्याची शक्यताही कमी आहे आणि योग्य तो उमेदवारही या पक्षाकडे नाही तरीही राष्ट्रवादीने एक मोठा उमेदवार डोळ्यासमोर ठेवून मतदारसंघ मागून घेेतला. लातूरचे भाजपाचे नेते रमेश कराड यांना भाजपातून फोडून राष्ट्रवादीत आणून त्यांना उमेदवारी दिली. रमेश कराड हे गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहावरून भाजपात आलेले भाजपाचे निष्ठावंत नेते होते. त्यांची भाजपावर तर निष्ठा होतीच पण त्यातल्या त्यात गोपीनाथ मुंडे आणि आता पर्यायाने पंकजा मुंडे यांच्यावरही तेवढीच निष्ठ होती. पण धनंजय मुंडे यांनी त्यांना भाजपातून फोडून राष्ट्रवादीत आणून आपल्या बहिणीला एक धक्काच दिला.

उमेदवारी जाहीर होऊन दोन तीन दिवस झाले आणि कराड यांनी आपला अर्ज दाखल केला. सोमवार दि. ७ मे हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मैदानात सात उमेदवार होते. त्यातले भाजपाचे सुरेश धस, राष्ट्रवादीचे रमेश कराड आणि राष्ट्रवादीचे असूनही पक्षाने उमेदवारी न दिलेले अशोक जगदाळे असे तीन उमेदवार मैदानात राहतील असे वाटत होते त्यानुसार अन्य चौघांनी अर्ज मागे घेतले. पण शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीचे मातबर उमेदवार रमेश कराड यांनीही माघार घेतली. अशा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज मागे घेण्याचा प्रकार कधी घडत नसतो पण रमेश कराड यांनी या कल्पनेला धक्का दिला. कराड यांना राष्ट्रवादीत आणून धनंजय मुंडे यांनी बहिणीला धक्का दिला होता पण कराड यांची उमेदवारी अशी अचानक मागे घ्यायला लावून पंकजा मुंडे यांनी बंधू धनंजय मुंडे यांना धक्का दिला. आता राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांना अपक्ष असलेल्या अशोक जगदाळे यांनाच आपला उमेदवार म्हणावे लागत आहे.

Leave a Comment