अपचनामुळे भूक लागत नसल्यास करा हे उपाय


जर व्यवस्थित भूक लागत नसेल, किंवा अन्न घेण्याची इच्छा होत नसेल, तर हे लक्षण पचनतंत्रामध्ये बिघाड झाल्याचे किंवा इतर कोणता आजार असल्याचे असू शकते. त्यामुळे ह्यासाठी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जर भूक न लागणे, किंवा कमी लागणे पचनतंत्राच्या बिघाडाशी संबंधित असेल, तर ही समस्या दूर करण्याकरिता काही घरगुती उपाय करता येतील.

फिट राहण्यासाठी योगासने करणे हा चांगला पर्याय आहेच, पण त्याशिवाय जठराग्नी प्रदीप्त व्हावा, खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन व्हावे, आणि आपण खात असलेल्या अन्नामधील पोषक तत्वे शरीरामध्ये अवशोषित व्हावीत ह्याकरिता देखील योगासने सहायक आहेत. योगासनांच्या व्यतिरिक्त इतर व्यायाम किंवा खेळ ह्यांचा समावेश आपल्या दिनक्रमात केल्याने आपण खात असलेल्या अन्नातील अतिरिक्त कॅलरीज खर्च होण्यास मदत होते, व भूकही व्यवस्थित लागते.

आपल्या दिनक्रमामध्ये जेवण्यासाठी एक ठराविक वेळापत्रक ठरावा आणि त्याचे पालन करा. दिवसातून तीन वेळा पोटभर जेवायचे की पाच ते सहा वेळा थोडे थोडे खायचे हे प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्यानुसार आणि आवडीनुसार ठरवावे. पण जे काही खायचे असेल, ते पौष्टिक असावे. जंक फूड, प्रोसेस्ड अन्नपदार्थांचे सेवन माफक प्रमाणात करावे. अश्याने अन्नाचे पचन व्यवस्थित होईल आणि भूकही नीट लागेल. आपण खात असलेल्या पदार्थांमध्ये अत्यधिक प्रमाणात तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. तसेच अन्नामध्ये आले, जिरे, ओवा ह्या पदार्थांचा उपयोग करावा, ह्या पदार्थांमुळे अन्नाचे पचन होण्यास मदत होते.

जर भूक कमी लागत असेल, किंवा अजिबात लागत नसेल, तर ही समस्या दूर करण्याकरिता काही घरगुती उपायांचा अवलंब करता येईल. मात्र ह्या संदर्भात डॉक्टरांचा सल्ला घेणेही अगत्याचे आहे. आले किसून घेऊन त्याचा रस काढून घ्यावा. एक ग्लास गरम पाण्यामध्ये एक चमचा आल्याचा रस आणि मध घालून ह्याचे सेवन करावे. ह्याने पचनदोष कमी होतो. तसेच दोन ते तीन कप पाण्यामध्ये एक मोठा चमचा बडीशेप आणि अर्धा लहान चमचा मेथीदाणे घालावेत. हे पाणी उकळून घेऊन थंड होऊ द्यावे. त्यानंतर हे पाणी गाळून घेऊन प्यावे.

वेलदोड्याचे दाणे चावून खाल्ल्याने देखील अन्नपचन व्यवस्थित होण्यास मदत होते. किंवा एक ग्लास पाण्यामध्ये दोन वेलदोडे उकळावेत. हे पाणी थंड झाल्यानंतर प्यावे. त्याचप्रमाणे दुपारच्या जेवणासोबत जिरे पूड, काळे मीठ आणि सैंधव घातलेले ताक प्यावे. लवंग, छोटी पिप्पली, समप्रमाणात घेऊन त्याचे चूर्ण बनवावे. लहान चिमुट चूर्ण अर्धा चमचा मधामध्ये मिसळून घ्यावे. हे चूर्ण सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा घ्यावे. ह्या सर्व उपायांनी अन्नाचे पचन व्यवस्थित होऊन भूक वाढण्यास मदत होते.

Leave a Comment