उच्च विद्या विभूषित दहशतवादी


काश्मीरमध्ये गेल्या सोमवारी लष्कर आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले. या पाच जणांत एका प्राध्यापकाचा समावेश होता. त्यामुळे पोलीस चक्रावले आहेत कारण गेल्या काही दिवसांत दहशतवादी संघटनांत सहभागी होणार्‍या उच्च शिक्षित तरुणांची संख्या वाढत चालली आहे. या आधी पदवीधर तरुण जरी दहशतवादी झाले तरीही आश्‍चर्य व्यक्त केले जात असे पण आता प्राध्यापक आणि डॉक्टरेट मिळवलेले संशोधकही दहशतवादी कारवायात सहभागी होत आहेत. काल ठार झालेला प्राध्यापक दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आणि त्यांनी निदर्शने करून प्राध्यापकाचा तपास करण्याची मागणी केली पण दोनच दिवसात हा बेपत्ता प्राध्यापक अतिरेकी संघटनेत सहभागी झाला असल्याचे आढळले.

ही गोष्टही जेव्हा तो चकमकीत ठार झाला तेव्हाच लक्षात आली. चकमक सुरू असतानाच पोलिसांना त्याचा पत्ता लागला तेव्हा त्यांनी त्याच्या आईला बोलावून घेतले आणि तिने आपल्या मुलाला शरण येण्याचे आवाहन केले. पण तो बधला नाही. शेवटी त्याला ठार करण्यात आले. अशा सुशिक्षित दहशतवाद्यांच्या बाबतीत पोलीस नेहमी हाच उपाय योजितात. ते या अतिरेक्यांच्या पालकांनाच पाचारण करून त्यांनी आपल्या मुलांना आवाहन करावे असा आग्रह धरतात पण मुळात काही पालकच असे आवाहन करायला तयार होत नाहीत आणि झाले तरीही मुले त्यांचे ऐकत नाहीत.

अशी ही मुले दहशतवादी होण्याची एक साखळीच आहे. एखादा अतिरेकी ठार झाला की त्याची मोठी प्रेतयात्रा काढली जाते आणि तिच्यातले वातावरण नव्या अतिरेक्यांना प्रक्षुब्ध करणारे ठरते. अशा प्रत्येक अंत्ययात्रेतून निदान दोन ते तीन तरुण नव्याने दहशतवादी बनतात. ते आपल्याला आवडेल त्या संघटनेत जातात. असे तरुण दहशतवादी झाले की, घातपाती कारवायांत सामील होणार्‍या स्थानिक दहशतवाद्यांची संख्या वाढलेली दिसते. पूर्वी घूसखोर दहशतवादी पाकिस्तानातून आलेले असायचे. असे दहा जण भारतात घुसले तर त्यातला एखादा भारतीय असायचा पण आता ही संख्या वाढली आहे. २०१८ सालच्या पहिल्या चार महिन्यांत निरनिराळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत ५५ दहशतवादी ठार झाले असून त्यातले २७ जण स्थानिक आहेत. ही बाब पोलिसांना आणि सुरक्षा जवानांना विशेष चिंताजनक वाटत आहे.