यंदा उन्हाळ्यामध्ये आनंद घ्या अॅक्वा योगाचा


आजकाल आपल्या फिटनेसबद्दल जागरूक असणाऱ्यांना फिट राहण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कोणी रनिंग करत आहेत, तर कोणी एरोबिक्स, झूम्बा, किक बॉक्सिंग, सायकलिंग, योग अश्या अनेक तऱ्हेच्या व्यायामप्रकारांचा अवलंब करतात. यंदाच्या उन्हाळ्यामध्ये थंड पाण्याचा आनंद घेत अॅक्वा योगाचा पर्याय ही तुम्ही निवडू शकता.

अनेकांना योगासने केल्यानंतर, आसनांमुळे स्नायूंवर आलेल्या ताणामुळे शरीरामध्ये वेदना सुरु होतात. अश्या व्यक्तींनी अॅक्वा योग जरूर करून पाहावा. पाण्यामध्ये उभे राहून योगासने करण्याला अॅक्वा योगा म्हटले गेले आहे. पाणी तरणशील असल्याने ह्यामुळे सांधे आणि स्नायूंवर कमी दबाव पडतो. त्यामुळे शरीराला जास्तीत जास्त ताण देणे शक्य होते. ह्या ताणामुळे कोणत्याही प्रकारची वेदना होत नसल्यामुळे तुम्ही अस्वस्थ न होता ह्या व्यायामप्रकाराचा आनंद घेऊ शकता. पाण्यामध्ये उभे राहून योगासने केल्याने स्नायू अधिक उत्तम पद्धतीने टोन होतात, शरीर अधिक लवचिक बनते, आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.

अॅक्वा ओग केल्याने स्नायूंवर आणि सांध्यांवर अतिशय कमी ताण पडत असल्याने ज्यांना सांधेदुखी, पाठदुखी, पाठीच्या स्नायूंमध्ये ‘स्टीफनेस’, कंबर किंवा पाठ आखडलेली असणे, अश्या प्रकारच्या समस्या असतील त्यांच्या साठी हा व्यायामप्रकार उत्तम आहे, त्याचप्रमाणे गर्भवती महिलांसाठी ही अॅक्वा योग फायद्याचे ठरू शकते. पाण्यामध्ये शरीर हलके होत असल्याने जास्त अडचणींशिवाय शरीर जास्तीत जास्त ताणले जाऊ शकते. तसेच ह्या मध्ये कोणत्याही प्रकारची दुखापत होण्याची शक्यता अतिशय कमी असते. ह्यासाठी तुम्हाला कोणत्याही खास साधनांची आवश्यकता नाही. ह्यासाठी केवळ स्विमिंग सूट आणि स्विमिंग पूलची आवश्यकता आहे.

हा व्यायामप्रकार जितक्या नियमितपणे केला जाईल, तितका तो शरीरासाठी फायदेशीर आहे. मात्र हा व्यायामप्रकार करताना क्वचित स्नायू आखडू शकतात, किंवा क्रँम्पस् येण्याची शक्यता असते. त्यामुळे तज्ञांच्या निरीक्षणाखाली हे व्यायामप्रकार करणे आवश्यक आहे. ह्या व्यायामप्रकाराच्या दरम्यान साधारण एका तासामध्ये सुमारे आठशे ते एक हजार कॅलरीज खर्च होतात.