भुजबळांना जामीन


महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना २६ महिन्यांच्या तुरुंगवासानंतर जामीन मिळाला आहे. त्यांना उच्च न्यायालयाने पाच लाख रुपयांच्या जामिनावर मुक्त केले आहे. अर्थात अशा जामिनाला अनेक अटी असतात आणि त्या अटी मान्य करूनच आरोपी जामीन मागत असतात. अटी मान्य करायला काही वाटत नाही कारण दरम्यान झालेल्या तुरुंगवासामुळे जेल ही काय भानगड असते याचा विदारक अनुभव घेतलेला असतो. माणसाला जो पर्यंत तो आत जात नाही तोपर्यंत तुरुंगाची काही भीती वाटत नाही पण प्रत्यक्षात तुरुंगात गेल्यावर तिथे एकट्यानेच बसणे ही किती त्रासदायक शिक्षा असते हे लक्षात येते. म्हणूनच एकदा तुरुंगातून बाहेर आलेला माणूस पुन्हा तुरुंगात जायला घाबरत असतो.

छगन भुजबळ यांच्या पाठीराख्यांनी त्यांना जामीन मिळताच आनंद प्रकट केला. खरे तर भुजबळ काही भ्रष्टाचाराच्या आरोपातून मुक्त झालेले नाहीत. त्यांच्यावरचा खटला सुरूच राहणार आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपातून ते निर्दोष ठरण्याची शक्यता कमीच आहे. किंबहुना त्यांच्यावरचे आरोप सबळ पुराव्यावर आधारलेले आहेत म्हणूनच न्यायालये त्यांना जामीन देत नव्हती. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपात अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळणे कठीण व्हावे असा कायदाच आहे. आपल्यावर लावण्यात आलेले आरोप अगदीच निराधार आहेत असे दाखवून देण्यात त्याला यश आले तर मात्र त्याला जामीन मिळू शकतो. तसे काही भुजबळांना सिद्ध करता येत नव्हते म्हणूनच त्यांचा जामीन अर्ज वारंवार फेटाळण्यात येत होता.

असे असले तरी जामीन नाकारणारी ही तरतूद कायद्याच्या मूळ हेतूशी विसंगत आहे. आरोप खरे असोत की खोटे असोत पण तपास काम पुरेसे झाले की, आधी आरोपी जामिनावर मुक्त झाला पाहिजे आणि खटल्यात आरोप सिद्ध झाल्यावर मग शिक्षा झाली पाहिजे. आरोप सिद्ध न होताच दोन दोन वर्षे तुरुंगात काढावे लागावेत हे काही योग्य नाही. खुनाच्या आरोपावरून खटला भरलेल्या आरोपींनाही जामीन मिळतो मग आर्थिक आरोपातल्या आरोपींनाच ही जामिनाची सवलत का नाकारली जावी असा सवाल करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. तिचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने याचिकेतला युक्तिवाद मान्य केला आणि आथिर्ंक आरोपींना जामीन द्यावा असा आदेश दिला. या निकालाचा आधार घेऊन भुजबळ यांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात जामिनाचा अर्ज केला आणि त्यात त्यांना यश आलेच पण त्यांचे वय आणि आजार यांचाही लाभ त्यांना या बाबत मिळाला आहे.

Leave a Comment