कलाकारांची नाराजी


दोनच दिवसांपूर्वी कॉमनवेल्थ गेेम्समध्ये पदके मिळवून आलेले भारतीय खेळाडू पंतप्रधानांना भेटले. पंतप्रधान मोदी यांनी या सर्वांचे अभिनंदन केले. त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांना पंतप्रधानांनी जी वागणूक दिली त्यामुळे ते प्रभावित झाले. त्यातल्या गीता फोगाट आणि अन्य काही खेळाडूंनी माध्यमांशी बोलताना पंतप्रधानांच्या भेटी विषयी संतोष व्यक्त केला. आजवरचे पंतप्रधान हे काही खेळांचे वैरी होते असे नाही पण त्यांना खेळाविषयी विशेष रुची नव्हती. त्यामुळे त्यांच्या भेटीत औपचारिकपणे चर्चा होत असे. मोदी यांच्याशी झालेली चर्चा मात्र मनापासून होती. त्यांना सगळ्या खेळात विलक्षण रुची आहे असे त्यांच्या वागण्यातून जाणवत होते.

या खेळाडूंनी इतकी चांगली प्रतिक्रिया नोंदल्यामुळे सरकारविषयीचा आदर वाढला. या मुलाखतींचे शब्द हवेत विरतात न विरतात तोच नेमका उलटा अनुभव देणारा प्रसंग चित्रपट कलाकारांच्या बाबतीत घडला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात विजेत्या कलाकारांवर सरकारविषयी नाराजी व्यक्त करण्याची पाळी आली. हे पुरस्कार वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते होणार होते पण ऐनवेळी कार्यक्रमात बदल करण्यात आला. राष्ट्रपती या कार्यक्रमाला येणार नसल्याने त्यांच्या ऐवजी माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते हा कार्यक्रम होईल असे जाहीर करण्यात आले. या प्रकाराने कलाकार नाराज झाले आणि त्यातल्या काही कलाकारांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

असा प्रकार का घडला ? सगळे कलाकार राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास उत्सुक होते. त्यात त्यांना गौरव वाटत होता पण राष्ट्रपतींना ऐनवेळी काही महत्त्वाचे काम निघाले त्यामुळे त्यांची निराशा झाली. अर्थात त्यांनी राष्ट्रपतींच्याच हस्ते पुरस्कार मिळावा याचा हट्ट धरणे पुरेसे सयुक्तिक नाही पण हा कार्यक्रम पूर्व नियोजनानुसारच होईल याची खबरदारी घेणे हे सरकारचे कर्तव्य होते. राष्ट्रपतींना ऐनवेळी काही नवे काम निघू शकते हे खरे पण त्यांनी याही कार्यक्रमाला तेवढेच महत्त्व द्यायला हवे होते. तसे व्यवस्थापन कौशल्य संबंधित खात्यात असले पाहिजे. पण तसे ते नसल्यामुळे विनाकारण कलाकारांत नाराजी व्यक्त झालीच पण जनतेसमोरही एक नकारात्मक संदेश गेला.खेळाडूंनी सरकारची प्रशंसा केली आणि त्यातून जे मिळवले होते ते कलाकारांना नाराज करून गमवले गेले.

Leave a Comment