दुर्दैवी दगडफेक


जम्मू काश्मीरमध्ये हिंसक कारवायांत गुंतलेल्या भाडोत्री अतिरेक्यांचे डोके खरेच फिरले आहे की त्यांच्यावर लष्कराने फार दबाव टाकल्याने ते हताश झाले आहेत हे काही कळत नाही कारण त्यांनी बर्‍याच दिवसांनी पुन्हा आपले दगडफेकीचे सत्र सुरू करताना चक्क शाळेतल्या मुलांना लक्ष्य केले आहे. त्यांनी काश्मीरच्या दक्षिण भागात असलेल्या शोपियान जिल्ह्यात सहलीवर आलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या बसगाड्यांवर दगडफेक केली आहे. जम्मू काश्मीरमधील अतिरेकी कारवायांच्या इतिहासात अनेक नृशंस घटना घडल्या पण निष्पाप मुलांवर दगडफेक करण्याचा हा एकमेव प्रकार आहे. या दगडफेकीत ३ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.

हा प्रकार काही चुकून माकून झालेला नाही. तो जाणीवपूर्वक घडवण्यात आला आहे. विशेष म्हणजे सहलीवर चार बसमधून जात असलेलेे ही विद्यार्थी बाहेरचे कोठले नव्हे तर काश्मीरच्याच पहेलगाम या जिल्ह्यातल्या शाळेचे होते. गेल्या काही महिन्यांत काश्मीरमधील दगडफेकीचे सत्र बंद होते. काश्मीर प्रश्‍न सोडवण्यासाठी केन्द्राने मध्यस्थ म्हणून नेमलेले माजी सनदी अधिकारी दिनेश्‍वर शर्मा यांची नेमणूक झाल्यापासून अनेक उपाय योजिण्यात आले आणि काही काळ तरी दगडफेकीचे प्रकार थांबले. शर्मा यांनी दगडफेकीत गुंतलेल्या आणि प्रथमच अशा प्रकारात आरोपी झालेल्या ९ हजार तरुणांना सरसकट माफी देण्याचा निर्णय घेतला होता. या पावलाचे काही परिणाम जाणवू लागले होते पण मध्येच हा प्रकार घडल्याने काश्मीर प्रश्‍न सोडवण्याच्या प्रयत्नांना खिळ बसली आहे.

विशेष म्हणजे या प्रकाराचा काश्मीर मधील अनेक नेत्यार्ंनीं आणि संघटनांनी जाहीर निषेध केला आहे. त्यांनी दिनेश्‍वर शर्मा यांच्या प्रयत्नांबद्दल आणि त्यांच्या मध्यस्थीच्या यशा बाबत शंका प्रदर्शित करायला सुरूवात केली आहे. खरे तर शर्मा यांचे प्रयत्न सुरूच आहेत. त्यांना काही प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने सकारात्मक वातावरण तयार होत होते. मात्र काश्मीरमध्ये सकारात्मक काही घडायला लागले की, अतिरेकी शक्ती तो माहौल खराब करण्यासाठी कसली का होईना पण हिंसक कारवायी करतातच. अनेक वर्षांचा तसा अनुभव आहे. तो त्यांचा डावच असतो. मात्र असा डाव टाकताना त्यांनी लहान मुलांना लक्ष्य करावे ही बाब मोठीच खेदाची आहे.

Leave a Comment