गँगस्टर सडणार जेलमध्ये


दाऊद इब्राहीम असो की छोटा राजन असो असे मोठे गँगस्टर कितीही अपराध केले तरीही पोलिसांना कधी सापडत नसतात आणि त्यांना कधी शिक्षा होत नसते असा अनेक तरुणांचा समज असतो. पोलीस सतत त्यांच्या मागावर असल्याचे दाखवत असले तरीही ते या दादांना पकडत नाहीत, उलट मंत्रीसुद्धा त्यांना टरकून असतात, अशा समजुतीत असलेले अनेक तरुण आपणही असाच मोठा दादा व्हावे अशी महत्त्वाकांक्षा बाळगून असतात. मध्यंतरी तर मुंबईतल्या अनेक तरुणांत असा दादा होण्याची मोठी क्रेझ होती. मात्र छोटा राजन याची सध्या जी अवस्था झाली आहे ती पाहिली म्हणजे अशा अल्पमतीच्या तरुणांचा पुरता भ्रमनिरास झाल्याशिवाय राहणार नाही. पोलिसांना सतत गुंगारा देणारा आणि परदेशात राहून ऐष करतो असे भासवणारा हा गँगस्टर आता जन्मभर तुरुंगात अक्षरश: कुजत पडणार आहे.

छोटा राजन काही अपराधांबद्दल दिल्लीस्थित तिहार कारागृहात शिक्षा भोगत असतानाच त्याला काल आणखी एक जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. मुंबईतील पत्रकार जे डे याच्या खुनाबद्दल छोटा राजनसह ९ जणांना मरेपर्यंत कारागृहात राहण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात १३ जणांवर आरोप होता. त्यातल्या जिग्ना वोरा ही पत्रकार आणि तिचा अन्य एक सहकारी निर्दोष सुटले. दोेघे फरारी आहेत. उर्वरित नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. बनावट पासपोर्ट तयार करण्याच्या प्रकरणात सध्या सात वर्षाची सजा भोगत असलेला छोटा राजन सात वर्षांनी तरी आपली सुटका होईल अशी आशा बाळगून असतानाच त्याला आता जन्मभर आत राहण्याची शिक्षा मिळाली आहे.

छोटा राजन हा एका मिल कामगाराचा मुलगा पण गुन्हेगारी विश्‍वाच्या संपर्कात येऊन बिघडला आणि गँगस्टर झाला पण आता त्याची नशा उतरली आहे. एखाद्या प्रकरणात नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा होण्याची ही गेल्या काही वर्षातली पहिलीच वेळ आहे. या प्रकरणातले पत्रकार जे डे मोठे अभ्यासू पत्रकार होते आणि त्यांनी मुंबईतल्या गुन्हेगारी विश्‍वावर दोन पुस्तके लिहिली होती. या खून खटल्यावर बरेच काही लिहिले जाईल पण मोठ्या गँगस्टरलाही शिक्षा होऊ शकते हे या प्रकरणात दिसून आल्यामुळे गुन्हेगारी विश्‍वात शिरून मोठे करीयर करण्याच्या कल्पना रंगवणार्‍या अबोध तरुणांना विचार करायला लागणार आहे. ही या प्रकरणातली मोठी उपलब्धी आहे.

Leave a Comment