गंगा उलटी वहातेय


आजकाल शिक्षणावर थोडा बहुत विचार करणारा कोणी ज्येष्ठ नागरिक भेटला की तो लहान मुलांच्या पालकांना तळमळीने काही सांगताना दिसतो. सध्या आपल्या मुलांंना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याची मोठी क्रेझ आहे. मुलगा किंवा मुलगी इंग्रजी माध्यमातून शिकली की ती शहाणी आणि स्मार्ट होणार आणि सध्या लहान खेड्याचे स्वरूप आलेल्या या जगात तिला कोठेही कसली अडचण येणार नाही असा या इंग्रजीवेड्या पालकांचा समज असतो. या समजुतीपोटी ते आपल्या मुलांना भरमसाठ फी आणि अमाप देणगी देऊन इग्रजी माध्यमाच्या शाळांत घालतात. पण हे काही बरोबर नाही असे त्या ज्येष्ठ व्यक्तीचे म्हणणे असते कारण शिक्षणशास्त्र असे सांगते की, मुलांना आपण जे शिकतो त्याचे नीट आकलन व्हायचे असेल तर त्याचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच झाले पाहिजे.

असे हे लोक कितीही समजून सांगोत पण त्यांचे म्हणणे एक अरण्यरुदन ठरायला लागले आहे कारण त्यांनी कितीही आक्रोश करूदेत, लोकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडील ओढा काही कमी होत नाही. उलट तो वाढत आहे आणि त्याचा गैरफायदा घेऊन खेडापाड्यातही इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढल्या जायला लागल्या आहेत. उलट मराठी शाळा बंद पडत आहेत. आता मुंबईत तर मनपाच्या शाळा सोडल्या तर एकही संस्था शुद्ध मराठी माध्यमातून शिक्षण देताना दिसत नाही. पालकही भरपूर फी दिलीय म्हणजे आपले मूल आता स्मार्ट होणार या भ्रमात आहेत. त्याचा गणवेष, टाय आणि शूज पाहिले आणि त्यांनी चार इंग्रजी शब्द टाकले की पालकांनाही आनंद होत आहे.

असे असले तरीही आता आता ज्येष्ठ व्यक्तींचे हे आक्रंदन सत्कारणी लागताना दिसत आहे. आपले मूल स्मार्ट दिसेल म्हणून त्याला इंग्रजी माध्यमात घालणार्‍या पालकांना ते केवळ दिसायलाच स्मार्ट आहे आणि त्याला गणित म्हणावे तेवढे समजलेले नाही हे लक्षात यायला लागले आहे. विज्ञानाच्या अनेक संकल्पना जशा मराठीतून समजू शकतात तशा त्या या परक्या भाषेतून समजत नाहीत हेही त्यांना जाणवत आहे आणि ग्रामीण भागातली मराठी माध्यमात शिकलेली मुले आणि मुली स्पर्धा परीक्षांत चमकतानाही दिसत आहेत. दिसायला स्मार्ट असलेल्या आपल्या मुलापेक्षा त्याच्याच वयाचे जि. प. शाळेत मराठीतून शिकणारे मूल अभ्यासात स्मार्ट आहे हे त्यांना प्रत्यक्षात दिसत आहे अणि अनेक पालक आता आपल्या मुलांना इंग्रजी शाळेतून काढून मराठी शाळेत घालायला लागले आहेत. त्यांच्या मानेवर बसलेले इंग्रजी माध्यमाचे भूत उतरायला लागले आहे. अनेक गावांतून अशा बातम्या येत आहेत आणि मराठी माध्यमाच्या शाळा बहरायला लागल्या आहेत. एक मोठी शैक्षणिक चूक दुरुस्त होत आहे.

Leave a Comment