ध्वनिप्रदूषणाचे बळी


आपण हवा आणि पाणी यांच्या प्रदूषणाबाबत नेहमीच बोलत असतो पण त्यातल्या त्यात आवाजाने होणार्‍या प्रदूषणाच्या दुष्परिणामांची आपल्याला कल्पना नसते. शहरांतून मोठ्या मिरवणुका काढल्या जातात आणि त्यातल्या गाण्यांचा आवाज ध्वनिवर्धकांनी पुरेसा कर्कश्य वाटत नाही म्हणून तो डॉल्बी लावून अधिक कर्कश्य केला जातो. अशा कर्कश्यपणाच्या विरोधात कोणी तक्रार केली की मग मिरवणुका काढणारांच्या भावना दुखावल्या जातात पण, डॉल्बीचा आवाज किती घातक असतो याची त्यांना कल्पना नसते. काही लोकांनी डॉल्बी लावल्याशिवाय मिरवणूक काढल्याचे सार्थक झालेय असे वाटतच नाही. डॉल्बीच्या आवाजाने कानाला दडे बसतात आणि बहिरेपणा येण्याची शक्यता असतेे.

ध्वनि हा काय प्रकार आहे हे आपल्याला पुरतेपणी माहीत नाही. पण ध्वनीच्या लहरी असतात आणि त्या आपल्या कानावर आदळत असतात. त्या आदळण्याने कानाचा पडदा फाटण्याची शक्यता असते. लोकांना हे पुरतेपणाने पटत नाही पण दोन वर्षांपूर्वी गणेश चतुर्थीच्या काळात घडलेली कराड येथील घटना सांगितल्यास ती पटेल. कराडच्या एका मिरवणुकीत डॉल्बीचा आवाज एवढा मोठा सोडलेला होता की तिच्या जवळून जाणार्‍या माणसाच्या शरीराला त्या आवाजाने हादरे बसायला लागले. मिरवणुकीच्या मार्गावर एक जुने घर होते आणि त्या घराच्या भिंती खिळखिळ्या झाल्या होत्या. त्यातली भिंत डॉल्बीच्या ध्वनिलहरींनी पडली. एवढा त्यांचा परिणाम असतो.

ध्वनिलहरी या काही केवळ मिरवणुकीतल्या डॉल्बीच्याच आवाजाच्या असतात असे नाही. लोक मोबाईलवर गाणे लावून ते गाणे हेडफोनवरून ऐकत असतात. अशा वेळी बाहेरून येणार्‍या आवाजाचा व्यत्यय येऊ नये म्हणून कानात हेडफोन असूनही आवाज मोठा सोडलेला असतो. अशी गाणी ऐकत जाणारांना आपल्या शेजारून एखादे वाहन गेले तरीही त्याचा आवाज ऐकायला येत नाही. वातहुकीची कोंडी होते तेव्हा सगळीकडे हॉर्न वाजायला लागतात. त्यांचाही कानावर परिणाम होत असतो. अशा अनेक प्रकारच्या आवाजांनी मुंबईतल्या ३० टक्के तरुणांना बहिरेपणा आला आहे. ध्वनिप्रदूषण दिनाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या पाहणीत ही गोष्ट लक्षात आली. विशेष म्हणजे यातल्या कित्येक तरुणांना आपल्याला बहिरेपणा आला आहे हे कळतही नाही. कधीतरी जवळचा माणूस काही तरी बोलतो पण समजत नाही तेव्हा त्याला कळते की आपल्या आसपासच्या गदारोळाने आपल्या कानाचा बळी घेतला आहे.

Leave a Comment