ही लक्षणे आढळ्यास आहारामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याचे ओळखा


गोड पदार्थ खाण्यास आवडत नाहीत अशी व्यक्ती विरळाच. आपण खातो त्या बऱ्याच पदार्थांमध्ये साखर कमी अधिक प्रमाणामध्ये असतेच. साखरेचे सेवन जर फार जास्त प्रमाणात होऊ लागले, तर आपल्या शरीरासाठी ते घातक ठरू शकते. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते पुरुषांनी दररोज ३७.५ ग्राम पेक्षा अधिक साखर खाणे आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरु शकते. महिलांच्या बाबतीत हे प्रमाण २५ ग्राम इतके आहे. केवळ एक बाटली कोका कोला घेतल्यानेच साखरेची ही निर्धारित मात्रा ओलांडली जात असते. आपल्या आहारामध्ये अतिरिक्त साखर निरनिराळ्या रूपांमध्ये खाल्ली जात असते. साखर आवश्यकतेपेक्षा खूपच जास्त प्रमाणात खाल्ली जात असल्यास आपले शरीर आपल्याला अनेक लक्षणांच्या द्वारे धोक्याची सूचना पाठवीत असते. ही सूचना वेळीच ओळखून तातडीने उपाययोजना केल्यास पुढील संभाव्य धोका टाळला जाऊ शकतो.

आपण जितकी जास्त साखर खाऊ, तितकीच आणखी साखर खाण्याची इच्छा प्रबळ होऊ लागते. अश्याने खूपच गोड खाणे हा एक सवयीचा भाग बनून जातो. साखर शरीरामध्ये तत्काळ उर्जा निर्माण करते. पण ही उर्जा जितकी पटकन निर्माण होते, तितकीच लवकर संपूनही जाते. त्यामुळे सतत गोड खाण्याची इच्छा होते. म्हणूनच सतत गोड खाण्याची इच्छा होत राहिली, तर जास्त प्रमाणामध्ये साखर खाल्ली जात आहे हे ओळखावे. आहारामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असले, तर शरीर सुस्तावते. काम करण्याचा उत्साह नाहीसा होतो. तसेच वजनही वाढू लागते. काम करताना एकाग्रता कमी होते. जर विनाकारण सतत थकवा जाणवत असेल, काम करण्याचा उत्साह वाटत नसेल, तर आहारामधील साखरेचे प्रमाण जास्त आहे हे ओळखून, ते कमी करून काही फरक पडतो का ते पाहावे.

साखरेचे प्रमाण जास्त असल्याने इंस्युलीन मध्ये ही अचानक चढउतार किंवा ‘ स्पाईक ‘ दिसून येतो, ह्यामुळे चेहऱ्यावर मुरुमे, पुटकुळ्या दिसून येऊ लागतात. त्यामुळे त्वचेवर वारंवार मुरुमे येऊ लागली, आणि त्यासाठी ट्रीटमेंट घेऊनही मुरुमे येण्याचे प्रमाण कमी होत नसेल, तर हे लक्षण आहारामध्ये साखर जास्त प्रमाणात असल्याचे असू शकेल. साखरेमध्ये प्रथिने किंवा फायबर काहीच नसते. त्यामुळे ही कितीही खाल्ली तरी भूक भागत नाही. त्यामुळे जास्त प्रमाणात साखर खाली जाऊन तितक्याच जास्त कॅलरीजही घेतल्या जातात. परिणामी वजन वाढू लागते.

साखरेचे अतिसेवन केवळ शारीरिक व्याधींसाठीच नाही, तर मानसिक तणावाला देखील कारणीभूत आहे. साखरेच्या अतिसेवनाने व्यक्तीचा स्वभाव अतिशय लहरी बनू शकतो. ह्या व्यक्तीचे मूड क्षणा-क्षणाला बदलू लागतात. साखर खाल्ल्याने ब्लड शुगरच्या पातळीमध्ये अचानक वाढ होणे आणि मग काही वेळाने शुगर एकदम खाली येणे ह्यामुळे हे ‘मूड स्वीन्ग्स’ उद्भवू लागतात. साखर अतिप्रमाणात खाणे हे दात किडण्याला आमंत्रण ठरते. तसेच पावलांवर सतत असलेली सूज आहारामध्ये साखरेचे प्रमाण गरजेपेक्षा खूप अधिक असल्याची सूचक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment