आता व्यवस्थापन शास्त्राची पाळी


१९९० च्या दशकात महाराष्ट्रात डी. एड. आणि बी.एड. महाविद्यालयांचा बाजार मांडला गेला. यातला कोणता तरी एक अभ्यासक्रम पुरा केला की छान आणि आरामाची नोकरी लागते अशा गैरसमजुतीने पदवीधर आणि बारावी उत्तीर्णांचे लोेंढे या महाविद्यालयात यायला लागले आणि अनेक पुढार्‍यांनी त्यांचा गैरफायदा घेऊन करोडो रुपये कमावले. आता महाराष्ट्रात असे डी. एड. आणि बी. एड. केलेले लाखो तरुण बेकार बसले आहेत. या लोकांनी आपण शिकतोय ते काय आहे आणि त्याच्या किती नोकर्‍या निर्माण होत आहेत याचा कधी विचारच केला नाही. तशीच अवस्था अभियांत्रिकी पदवीधरांचीही झाली आहे. एकेकाळी भरभराटीला आलेली ही महाविद्यालये आता बंद पडली आहेत आणि अनेक संस्थांनी आपली अभियांत्रिकी आणि शिक्षण शास्त्र महाविद्यालये बंद करण्याची अनुमती सरकारकडे मागितली आहे.

गेली तीन ते चार वर्षे अभियांत्रिकी महाविद्यालयांची शोकांतिका आपण ऐकत आहोत. पण आता व्यवस्थापन शास्त्राच्या म्हणजे एम. बी. ए. चे शिक्षण देणार्‍या संस्थांचीही अवस्था अशीच झाली आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०१७-१८ साली देशातल्या व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयांपैकी १०० महाविद्यालयांनी आपली संस्था बंद करण्याची अनुमती मागितली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद या संस्थेची अनुमती घेऊन ही महाविद्यालये निघाली आहेत. अशी अनुमती घेऊन सुरू झालेल्या भारतातल्या या संस्थांची संख्या ३ हजारावर आहे. त्यातल्या १०० संस्था आता पुढच्या वर्षी बंद होतील. या आधीच्या वर्षी ७८ संस्थांनी अशीच अनुमती मागितली होती. तर त्यापूर्वीच्या वर्षी ६६ संस्था बंद झाल्या होत्या. अशा रितीने देशातल्या ३ हजार संस्थांपैकी जवळपास २४५ संस्था बंद झाल्या आहेत.

त्याशिवाय १०१ अशी महाविद्यालये आहेत की, ज्यांत अनेक विषयांचे शिक्षण दिले जाते. अशांनी आपल्या व्यवस्थापन शास्त्रांचे म्हणजेच एम बी ए किंवा डी बी एम चे वर्ग बंद करण्याची अनुमती मागितली आहे. या महाविद्यालयांतले विद्यार्थी कँपस इंटरव्ह्यूमध्ये यशस्वी होत नसल्याने त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. कारण या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणारे विद्यार्थी नोकरी या एकाच निकषावर प्रवेश घेत असतात. ज्या महाविद्यालयातले विद्यार्थी चांगली नोकरी मिळवू शकतात त्याच महाविद्यालयांत प्रवेशाला गर्दी असते. नोकरी लागत नाही असे समजले की मुले आणि मुली अशा संस्थांत प्रवेश घ्यायला नकार देतात. अशा संस्था आता अडचणीत यायला लागल्या आहेत. शिक्षण केवळ नोकरीशी जोडले की अशीच स्थिती होणार हे उघड आहे.

Leave a Comment