नक्षलवाद्यांना दणका


गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात चाललेल्या दोन दिवसांच्या चकमकीत ३७ नक्षलवादी ठार झाले आहेत. पोलिसांच्या या कामगिरीचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी कौतुक केले आहे. आजवर कधीही एका वेळी एवढे बंडखोर ठार झाले नव्हते त्यामुळे या कामगिरीचे वर्णन नक्षलवाद्यांना दिलेला दणका किंवा नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले अशा शब्दात केले जाणे साहजिक आहे. आजवर अनेकदा असे नक्षलवादी ठार केले गेले आणि त्याचे वर्णन कंबरडे मोडले अशा शब्दात करण्यात आले होते तेव्हा त्याला काही लोकांनी विरोध केला होता कारण नक्षलवादी अशा एखाद्या मोठ्या कारवाईने अंतिमत:पराभूत होत नाहीत. अशी काही कारवाई झाली की त्यांना धक्का बसतो पण त्यानंतर काही दिवस ते दबलेले राहतात आणि नंतर मोका साधून पोलिसांवर हल्ला करून आपले कंबरडे मोडले नसल्याचे दाखवून देतात.

आता मात्र नक्षलवाद्यांचे खरोखरच कंबरडे मोडले आहे कारण एकाच वेळा त्यांचे ३७ कार्यकर्ते यमसदनाला पाठवले गेले आहेत. त्यातल्या त्यात या कारवायीत त्यांचा सर्वात वरिष्ठ नेता गणपती हाही मारला गेला असण्याची शक्यता आहे. अजून त्याच्या हत्येची खातरजमा झालेली नाही. पोलिसांनी हस्तगत केलेल्या सगळ्या मृतदेहांची तपासणी केली जाईल आणि नंतरच गणपती मारला गेला असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले जाईल. पोलिसांना तसा संशय आहे कारण त्यांनी नक्षलवाद्यांच्या हालचालींचा मागोवा घेऊनच ही कारवाई केली होती. त्यांना मिळालेल्या सूचनांनुसार गणपती त्या गावच्या म्हणजे कासवपूरच्या बैठकीला येणार होता आणि त्यामुळेच सारे नक्षलवादी तिथे जमले होते. तो खरोखरच आला असेल आणि ठार झाला असेल असे पोलिसांना वाटते. तसे झाले असल्यास नक्षलविरोधी कारवायी करणार्‍या गटासाठी ही आनंदाची बातमी असेल.

नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले जात नाही कारण त्यांना मिळणारी कुमक मोठी आहे असे समजणारा एक वर्ग या देशात आणि त्यातल्या त्यात राजकारणात आहे. पण या म्हणण्यात काही तथ्य नाही कारण नक्षलवाद्यांचे कंबरडे निदान आंध्रात आणि तेलंगणात तरी पूर्णपणे मोडले गेले आहे. तिथे एकेकाळी नक्षलवादी प्रभावी होते. त्यांनी एकेकाळी तिथले तेव्हाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर हल्ला करून त्यांच्याही हत्येचा प्रयत्न केला होता. ते तिरुपतीच्या दौर्‍यावर असताना हा हल्ला झाला होता. त्याला आता काही वर्षे झाली पण त्यानंतर संयुक्त आंध्राच्या पोलिसांनी कठोर कारवायी करून नक्षलवाद्यांना समूळ नष्ट केले आहे. एक दिवस महाराष्ट्रातही असे घडू शकते.

Leave a Comment