टाटांचा नवा विक्रम


टाटा उद्योग समूहातल्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस या कंपनीने १०० अब्ज डॉलर्सचा पल्ला पार करून हा विक्रम करणारी पहिली भारतीय कंपनी होण्याचा मान मिळवला आहे. टीसीएस ही भारतातली सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. सध्या जगात सगळीकडे मंदीचे वारे वहात असताना या कंपनीने मात्र नवा टप्पा गाठला असून आपल्या व्यवस्थापन कौशल्याचे जगाला दर्शन घडवले आहे. काल या कंपनीच्या शेअर्सची किंमत १०२ अब्ज डॉलर्सवर पोहचली. सामान्य माणसाला हा आकडा नीट कळणार नाही. एक़ अब्ज म्हणजे १०० कोटी. म्हणजे टीसीएस ची व्हॅल्यू आता १०० गुणिले १०० कोटी अर्थात १० हजार कोटी डॉलर्स एवढी झाली आहे.हा आकडा रुपयांत मोजल्यास तर तो सात लाख कोटी रुपयांवर पोचतो.

टाटांनी नेहमीच आपल्या व्यावसायिक कौशल्याने सगळ्या जगाला दिपविले आहे. १९९१ साली भारतात मुक्त अर्थव्यवस्थेचा अंमल सुरू झाला तेव्हा तिला विरोध करणारांनी ही अर्थव्यवस्था देशी उद्योगांना घातक असल्याची ओरड सुरू केली होती. आता परदेशी कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यास मुभा दिल्यावर त्या कंपन्या आपल्या देशातल्या लहान सहान कंपन्यांना गिळून टाकतील आणि त्यांचे साम्राज्य निर्माण होईल अशी या लोकांची शंका होती. त्यांनी कितीही शंका व्यक्त केल्या तरी ही अर्थव्यवस्था आल्यापासून निदान दहा वर्षे तरी कोणत्याही परदेशी कंपनीने भारतातली कोणतीही कंपनी गिळली नव्हती. उलट २००६ साली भारतातल्या काही कंपन्यांनी परदेशातल्या कंपन्या ताब्यात घ्यायला सुरूवात केली.

परदेशातली कंपनी गिळणारे पहिले भारतीय उद्योगपती टाटाच निघाले. त्यांनी ब्रिटनमधील दिवाळखोरीत निघालेला पोलाद प्रकल्प चालवायला घेतला आणि तो उत्तम चालवून दाखवला. हा प्रकल्प टाटा घेत होते तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या कारण या पोलाद प्रकल्पाची मालमत्ता टाटा उद्योग समूहाच्या ८४ उद्योगांच्या एकूण मालमत्तेच्या पाचपट एवढी होती. एवढा मोठा प्रकल्प चालवायला घेण्यास फार मोठे धाडस लागते. ते टाटांनी दाखवून दिलेच पण ही कंपनी छान चालवून आता जगातले दुसर्‍या क्रमांकाचे पोलाद उत्पादक असा मान मिळवला आहे. नंतर टाटांनी अनेक परदेशी कंपन्या ताब्यात घेतल्या आणि आता ते खर्‍या अर्थाने भारतातले बहुराष्ट्रीय उद्योगपती झाले आहेत. आता टाटा कंपनी चहा आणि वाहनांच्या निर्मितीत जगातल्या आघाडीच्या कंपन्यांत जमा आहे.

Leave a Comment