विक्रमी नोकर भरती


भारतीय रेल्वे ही जगातली सर्वात मोठी नोकर्‍या देणारी यंत्रणा समजली जाते. आता रेल्वेच्या इतिहासातली सर्वात मोठी नोकर भरतीची प्रक्रिया सुरू असून येते दोन महिने तिची धामधूम सुरू राहणार आहे. रेल्वेने आता ९० हजार जागांची भरती जाहीर केली आहे. रेल्वेची नोकरी म्हणजे सरकारी नोकरी. ती लागली की जीवनाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. म्हणून या ९० हजार जागांसाठी धडपडणार्‍यांची संख्याही दोन कोटी ५० लाख एवढी प्रचंड आहे. आजवर जगाच्या इतिहासात नोकर भरतीच्या प्रकरणात आलेल्या अर्जांचा हा विक्रमच आहे. जगात काही लहान देशांची लोकसंख्याही एवढी नसेल. या ९० हजार जागांतल्या २६ हजार ५०० जागा या लोको पायलटांच्या असून त्यासाठी ४७ लाख ५५ हजार अर्ज आले आहेत तर ६२ हजार ९०७ जागा ड वर्गातल्या असून त्यासाठी एक कोटी ८९ लाख अर्ज आले आहेत.

या पूर्वी अशीच मोठी नोकर भरती २०१४ साली झाली होती. तेव्हा केवळ १८ हजार २५२ जागा भरण्यात आल्या होत्या आणि या जागांसाठीचे उमेदवार ९२ लाख अर्जातून निवडण्यात आले होते. तीही भरती विक्रमी समजली गेली होती पण आताची नोकर भरती तिच्या पाचपट आहे. यावरून आताच्या नोकर भरतीची व्यापकता लक्षात येते. एवढी मोठी नोकर भरतीची प्रक्रिया हाताळणे ही काही सोपी गोष्ट नाही पण तिच्यासाठी रेल्वे बोर्डाची यंत्रणा सज्ज आहे. या बोर्डाच्या अधिकार्‍यांनी ही सारी प्रक्रिया कशी काम करते याचे तपशील दिले आहेत.

आपल्याला अडीच कोटी अर्ज कसे हाताळणार असा प्रश्‍न पडतो खरा पण अधिकार्‍यांना ही प्रक्रिया सुरळीत होईल असा विश्‍वास वाटतो. कारण आलेल्या अडीच कोटी अर्जातले सगळेच उमेदवार गांभीर्याने ही परीक्षा देत नसतात. यातले लक्षावधी अर्जदारांनी अर्ज भरण्याची प्रक्रियाही नीट पार पाडलेली नसते. असे अर्ज काढून रद्द करण्याचे पहिले कामच खरे जगडव्याळ असते. ते एकदा केले की मग उरलेल्या उमेदवारांची परीक्षा घेणे हे तुलनेने सोपे जाते. पहिली परीक्षा जवळपास अकरा हजार केन्द्रांवर घेतली जाते. तिच्यातले पेपर फुटू नयेत याची पुरेपूर काळजी घेतली जाते. तिच्यातून निवडलेले उमेदवार दुसरी परीक्षा देतात आणि तिच्यात पास झाल्यानंतर एक सामान्य तोंडी मुलाखत घेतल्यावर त्यांची निवड पक्की होते. या प्रकारात पुरेशी पारदर्शकता आणण्यासाठी आधी उमेदवारांना परीक्षेच्या पद्धतीविषयी हरकती घेण्याची अनुमती दिलेली असते. शिवाय कोणत्याही स्तरावर त्याला मिळालेले मार्क तपासून पाहण्याची संधी दिली जात असते.

Leave a Comment