तुमचे परफेक्शनिस्ट असणे तुमच्या मुलांकरिता अपायकारक तर ठरत नाही ना?


आजचा जमाना स्पर्धेचा आहे. आपले कां उत्तम रीतीने करता यावे आणि त्याकरिता पडेल तितके कष्ट घेण्याची तयरी असायला हवी अशी शिकवण मुलांना अगदी लहानपणापासून दिली जाते. पण मुले करीत असलेले प्रत्येक काम परफेक्ट हवे ह्याबद्दल आईवडील आग्रही असताना दिसतात. काही अंशी हा आग्रह ठीकही आहे, पण जेव्हा ‘परफेक्ट’ असण्याबद्दलच्या आग्रहाचा अतिरेक होतो, तेव्हा मुलांच्या कोवळ्या मनावर ताण येऊ लागतो. त्यामुळे प्रत्येक काम हे चोखच असायला हवे ह्याबद्दल आग्रह करताना, ह्याचा ताण मुलांच्या मनावर येऊन त्यांचा फायदा होण्याऐवजी नुकसान तर होत नाही ना, ह्याचा विचार पालकांनी करायला हवा.

कोणत्याही परिस्थितीमध्ये यशस्वी व्हायचेच असा काही अतिशय महत्वाकांक्षी पालकांचा आग्रह असतो. बहुतके वेळा मुले यशस्वी होतच असतात. पण कधी तरी काही कारणाने मुलांच्या वाट्याला अपयश आले, तर ते पेलण्याची ताकद ह्या मुलांमध्ये नसते. यश आणि अपयश ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे पालकांनी मुलांना समजावून सांगून, अपयश पचविण्यासाठी देखील मुलांना तयार करावे. तसेच, अपयश आले म्हणजे सर्व आशा संपली असे न समजता, पालकांनी मुलांशी संवाद साधून, मुले नक्की कुठे कमी पडली ते ओळखून पुन्हा नव्या जोमाने यशाकडे वाटचाल करण्याची हिम्मत आणि आत्मविश्वास मुलांमध्ये निर्माण करायला हवा.

पालक जर परफेक्शनिस्ट असतील, आणि मुलांनी देखील तसेच असावे अशी शिकवण मुलांना देत असतील, तर अशी मुले ‘सेल्फ क्रिटीकल’ होत जातात. अश्या मुलांना कोणत्याही कामामध्ये समाधान मिळत नाही. आपण केलेल्या प्रत्येक कामाचा मुले खूप विचार करीत राहतात, आणि केलेल्या प्रत्येक कामामध्ये त्यांना चुका दिसत राहतात. अश्याने मुलांच्या मनामध्ये काम पूर्ण केल्याचे समाधान असण्याऐवजी कामामध्ये कोणत्या उणीवा आहेत हे शोधत राहिल्याने ताण निर्माण होतो. अशी मुले कधीही समाधानी, आनंदी राहू शकत नाहीत.

ज्या मुलांचे पालक परफेक्शनिस्ट आहेत, ते आपल्या मुलामध्ये जराशी जरी उणीव दिसून आली, तर नाराज होतात. त्यांच्या ह्या नाराजीचा परिणाम मुलांच्या आत्मविश्वासावर होत असतो. आपण काही चांगले करू शकतच नाही असा नकारत्मक विचार मुलांच्या मनामध्ये डोकावू लागतो. त्यामुळे मुले सतत मानसिक तणावाखाली असतात. कधी परफेक्ट असण्याच्या पालकांच्या आग्रहाचा अतिरेक झाला तर मुले चिडचिडी बनतात. अशी मुले सतत नकारात्मक विचार करीत राहतात, त्यांना नैराश्य येऊ शकते.

आयुष्यामध्ये यशस्वी होण्याची महत्वाकांक्षा असणे आवश्यक आहे. पण ही महत्वाकांक्षा कुठवर पोहोचू द्यायची ह्याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. मुले लहान असली, तरी त्यांचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य त्यांना द्यायला हवे. त्यांच्या कडून कोणत्याही अपेक्षा करताना त्यांच्या इच्छा, त्यांची कुवत, त्यांच्या आवडी निवडी पालकांनी लक्षात घ्यायला हव्यात. असे केल्याने मुले स्वतः हूनच ते करीत असलेल्या कामांमध्ये रस घेतील आणि सकारात्मक दृष्टीकोन असल्याने कामामध्ये यशस्वी देखील होतील.

Leave a Comment