फोन निकामी झाले तर चक्क कबुतरांच्या मार्फत निरोप..!


फार जुन्या काळी जेव्हा दळणवळणाची कोणतीच साधने अस्तित्वात नव्हती, तेव्हा निरोप देण्यासाठी दूत असत. तसेच, लांबवर पण जलद गतीने कोणापर्यंत निरोप पोहोचवायचा असेल, तर त्यासाठी खास प्रशिक्षण दिलेली कबुतरे वापरली जाऊ लागली. त्यानंतर हळू हळू विज्ञानाने जसजशी प्रगती करण्यास सुरुवात केली, तसतशी दळणवळणाची नवनवीन साधने अस्तित्वात येऊ लागली. सर्वात आधी पोस्ट आले, पाठोपाठ तारा आल्या. संगणकाचा आविष्कार झाल्यानंतर कालंतराने ई-मेल आल्या. आणि आताच्या काळामध्ये तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल फोन आल्याने सर्व जग एका मेसेजच्या अंतरावर येऊन ठेपले आहे.

कबुतरांच्या मार्फत प्रेमाचा संदेश देणारी अभिनेत्री ‘ मैने प्यार किया ‘ ह्या चित्रपटामध्ये पाहायला मिळाली, आणि ‘कबुतर जा जा’ असे म्हणून आपल्या प्रियकराला संदेश पाठविण्याची ही कल्पना आणि हे गीत दर्शकांना पसंत पडले. पण आजच्या काळातही ‘कबुतर जा जा’, असे म्हणून जर कोणी संदेश पाठवत असेल, असे म्हटले तर त्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. पण ही संचार व्यवस्था अस्तित्वात आहे, आणि ही व्यवस्था प्रयत्नपूर्वक सुरळीत सुरु ठेवण्यात येत आहे. ओडिशा राज्यातील एका सरकारी कार्यालयामध्ये निरोप पाठविण्यासाठी आजच्या संगणक, इन्टरनेट आणि मोबाईल फोन्स च्या काळातही कबुतरांचा वापर केला जात आहे.

ओडिशा राज्याच्या पोलीस खात्याकडे निरोप पाठविण्यासाठी खास प्रशिक्षित अशी पन्नास कबुतरे आहेत. ही कबुतरे एका ठिकाणाहून दुसऱ्या नियोजित ठिकाणी निरोप घेऊन जाण्यात तरबेज आहेत. नुकतीच ह्या कबुतरांची चाचणी देखील घेण्यात आली. ह्य चाचणी मध्ये कबुतरांच्या मार्फत भुवनेश्वर येथील ओयुएटी ग्राउंड मधून कटक शहरातील एका नियोजित स्थळी संदेश पाठविला गेला. ह्या सगळ्या कसरतीचा उद्देश हा, की जर कधी काही कारणाने संदेशवाहक व्यवस्था बंद पडली, किंवा संदेश पाठविण्यासाठी दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नसेल, तर ह्या कबुतरांचा ‘इमर्जन्सी’ म्हणून वापर करून संदेश नियोजित स्थळी पोहोचविता येऊ शकेल. म्हणजेच, अत्याधुनिक यंत्रणा जर काही कारणाने निकामी झाली, तर पूर्वीच्या काळी अस्तित्वात असलेली संदेश वाहक यंत्रणा उपयोगात आणण्याचा विचार ह्या प्रयत्नांमागे आहे.

जेव्हा जेव्हा भयानक नैसर्गिक आपदा आल्या तेव्हा तेव्हा सर्वात आधी संदेशवहन यंत्रणा कोलमडून गेल्याचे दिसून येते. १९८२ साली ओडिशा राज्यामध्ये भयंकर पूर आला असता, सर्व संदेशवहन यंत्रणा संपूर्णपणे निकामी झाली होती. त्याकाळी देखील पोलिसांनी कबुतरांच्या मार्फत संदेश पाठवून आवश्यक मदतीसाठी निरोप पाठविले होते. संदेशवहन करणाऱ्या ह्या कबुतरांना ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट आणि कल्चर हेरीटेज’ ह्या संस्थेतर्फे प्रशिक्षण दिले जाते. ही कबुतरे ताशी ७५ किलोमीटरच्या वेगाने उडू शकतात. ज्या भागांपर्यंत किंवा गावांपर्यंत संदेश पोहोचण्याचा इतर कोणताच मार्ग उपलब्ध नसेल, तिथे ही ‘उडती ‘ संदेशवहन यंत्रणा कामी येऊ शकते. एका कबुतराचे आयुष्यमान सुमारे वीस वर्षांचे असून, त्यांना एकदा प्रशिक्षण दिले, की ही कबुतरे संदेशवहनासाठी दीर्घ काळपर्यंत वापरली जाऊ शकतात.

Leave a Comment