राज्यपालांचा औचित्यभंग


आपण एका जबाबदारीच्या पदावर काम करीत असू तर आपण कसे वागले पाहिजे याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे पण तसे ते ठेवले गेले नाही की एखादी लहानशीच चूक फार महागात पडू शकते. मंत्री, राज्यपाल किंवा वरिष्ठ अधिकारी यांना हे भान ठेवलेच पाहिजे. केन्द्रातले एक मंत्री प्रदीर्घकाळ लघवीला जाण्याची संधी न मिळाल्याने फार अवघडले होते पण कार्यक्रमातून बाहेर पडताच जी जागा मिळाली तिथे लघुशंका उरकायला लागले आणि त्याचे चित्रण झाले त्यामुळे पत्रकारांना टीकेला वाव मिळाला. आता तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या बाबतीत असाच प्रकार घडला आहे. याबाबतीत पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे फार सावध असतात आणि वागण्या बोलण्याच्या बाबतीत काटेकोर राहतात. त्यांचे अनुकरण सर्वांनी केले पाहिजे.

तामिळनाडूतल्या एका पत्रकार परिषदेत राज्यपाल पुरोहित यांना एका महिला पत्रकाराला तिच्या उत्तम कामगिरीसाठी शाबासकी देण्याचा मोह आवरला नाही. तिने तशी मोठी कामगिरी केली होती. पण कोणीही शाबासकी देताना ती पाठीवर देतात. महिलेला शाबासकी द्यायचीच असेल तर कोणीही हस्तांदोलन करील पण या साहेेबांनी त्या महिला पत्रकाराच्या गालावर हलकीच चापट मारून शाबासकी दिली. क्षणभर या पत्रकार महिलेला काय झालेय हे कळलेच नाही. पण हा प्रकार सर्वांसमक्ष झाला असल्याने इतर पत्रकारांनी हा प्रकार पाहिला होता आणि राज्यपालांच्या या वर्तनावर कुजबुज सुरू झाली. त्या सर्वांनी राज्यपालांना निवेदन देऊन नाराजी व्यक्त केलीच पण झाल्या प्रकारावर त्यांनी माफी मागावी अशीही जोरदार मागणी केली.

राज्यपालांचा बचाव असा होता की यामागे त्यांचा कसलाही वाईट हेतू नव्हता कारण ती पत्रकार त्यांच्या नातीच्या वयाची आहे. अर्थात हा खुलासाही काही पटण्यासारखा नाही. नात झाली म्हणजे एवढ़्या मोठ्या नातीच्या गालावर कौतुकाने चापटी मारणे समर्थनीय ठरतच नाही. शेवटी बनवारीलाल पुरोहित यांनी सर्वांची लेखी आणि बिनशर्त माफी मागितली. त्यांनी हे प्रकरण लांबवत ठेवले नाही हे त्यांच्या दृष्टीने बरे झाले. झालेल्या चुकीवर वेळीच माफी मागितली की नंतरचे बरेच प्रश्‍न सुटतात.पुरोहित हे नागपूरचे आहेत. तेही एका वृत्तपत्राचे मालक आहेत. ते मुळात कॉंग्रेसमध्ये होते पण १९९६ साली भाजपात आले आणि भाजपाचे खासदार म्हणून एकदा निवडूनही आले होते.

Leave a Comment