एटीएमने गाठला तळ


एटीएम या लघुरूपाचा विस्तार एनी टाईम मनी असा आहे. म्हणजे या यंत्राला कधीही साद घातली आणि आवश्यक ते कार्ड आत सरकवले की पैसे मिळतीलच. पण निदान भारतातल्या एटीएम मशिननी तरी ही व्याख्या फोल ठरवली आहे. त्यातून एनी टाईम म्हणजे नेहमीच पैसे मिळतील याची खात्री भारतातली कोणतीच बँक देत नाही. त्यामुळे सोशल मीडियाने या नावाचे विडंबन केले असून ते ‘असतील तर मिळतील’ पैसे असे केले आहे. आता गेल्या तीन दिवसांपासून तर देशातल्या १२ राज्यात नोटांचा खडखडाट झाला आहे. आर्थिक व्यवहारात कितीही घोटाळे झाले तरी सरकारजवळचे पैसे संपले असे कधीच होत नसते. पण आता तसे झाले आहे. सरकारचा नोटांचा पुरवठा कमी पडला आहे. आजवर असे कधी झाले नव्हते.

टंचाई मग ती पैशाची असो की धान्याची असो ती निर्माण करण्याची दोन कारणे असतात. पहिले कारण म्हणजे उपलब्ध असलेला माल कोणीतरी मोठ्या प्रमाणावर खरेदी करून त्याचा साठा करणे आणि दुसरे कारण म्हणजे त्याची मागणी अचानकपणे वाढणे पण त्या प्रमाणात पुरवठा न होणे. नोटांच्या बाबतीत दोन्ही गोष्टी एकदम घडल्या आहेत. वट्ट राष्ट्रीय उत्पन्न आणि चलनी नोटांचा पुरवठा यांचे गुणोत्तर ठरलेले असते त्यानुसार नोटांचा पुरवठा होत राहिला तर टंचाई होत नाही. वट्ट राष्ट्रीय उत्पन्नाच्या ११.५ टक्के एवढ्या नोटा चलनात असल्या पाहिजेत पण आता काही कारणांनी त्यांचा पुरवठा ११.५ टक्क्यांऐवजी १०.८ टक्क्यांवर आला आहे. म्हणजे वट्ट राष्ट्रीय उत्पन्न वाढून नोटा जास्त मागितल्या जात आहेत आणि त्यांचा पुरवठा मात्र त्या प्रमाणात कमी झाला आहे.

तीन दिवसांपूर्वी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आणि यंदा चांगला पाऊस पडेल असे भाकीत करण्यात आले. या भाकिताने शेतकरी सावध झाले आणि त्यांनी मोठ्या आत्मविश्‍वासाने पेरणीच्या कामाला सुरूवात केली. बी बियाणे, खते आणि तत्सम साहित्याची मोठ्या प्रमाणावर जमवाजमव केली. साधारणत: शेतकरी वर्ग रोखीनेच व्यवहार करीत असतो. याही व्यवहाराचा दबाव नोटांच्या पुरवठ्यावर पडला. मागणी जास्त आणि नोटांचा पुरवठा कमी झाला. भारतातले लोक अक्षय्य तृतियेला सोन्याची खरेदी करतात. यावर्षी ही खरेदी जादा होईल असा अंदाज आल्यामुळे सोन्याचे भाव गेल्या तीन वर्षातली जैसे थे स्थिती ओलांडून अचानकपणे वाढले आहेत. याचा अर्थ सोन्याची खरेदीही मोठ्या प्रमाणावर होणार या कल्पनेने एका बाजूला सोने विकणारांनी आणि दुसर्‍या बाजूला सोने खरेदी करणारांनी नोटांची उचल मोठ्या प्रमाणावर केली आहे. सोन्याची खरेदी तर सामान्यत: रोखीनेच होत असते. आता दोन हजार आणि पाचशेच्या नोटा मोठ्या प्रमाणावर छापाव्या लागणार आहेत.

Leave a Comment