केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी कढीपत्ता


जेवणामध्ये भाजी-आमटी साठी केलेल्या फोडणीमध्ये कढीपत्ता असला, तर भाजी आमटीला आगळीच चव येते. उपमा, सांबार या पदार्थांना तर कढीपत्त्याशिवाय लज्जतच नाही. पण केवळ अन्नाची रुची वाढविण्यासाठीच नाही, तर आपल्या केसांच्या आरोग्यासाठी देखील कढीपत्ता अतिशय गुणकारी आहे. केसांची संबंधित निरनिराळ्या समस्यांसाठी कढीपत्त्याचा वापर निरनिराळ्या पद्धतीने केला असता नक्कीच गुण दिसून येतो.

जर केस गळत असतील, तर तीन ते चार चमचे खोबरेल तेल गरम करून त्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकावीत. हे तेल कमी आचेवर काही मिनिटे गरम होऊ द्यावे. त्यानंतर गॅस बंद करुन तेल थंड होऊ द्यावे. थंड झालेले तेल गाळून घेऊन ह्या तेलाने केसांच्या मुळांशी मालिश करीत सर्व केसांना तेल लावून घ्यावे. वीस मिनिटे हे तेल केसांना राहू देऊन त्यानंतर नेहमीप्रमाणे केस धुवावेत. तसेच, केस जर रुक्ष, राठ होऊन त्यांची चमक नाहीशी झाली असले, तर कढीपत्त्याची काही पाने बारीक वाटून घ्यावीत आणि ही पेस्ट चार ते पाच चमचे दह्यामध्ये मिसळावी. हे पेस्ट केसांवर व्यवस्थित लावावी, व पंधरा मिनिटांनी केस धुवावेत. ही पेस्ट केसांवर कंडीशनर प्रमाणे काम करते. ह्या पेस्ट मुळे केस मुलायम आणि चमकदार होतात.

केस अनेकदा कंडीशनर लावूनही कोरडे, रुक्ष दिसतात. त्यांचा मुलायमपणा नाहीसा होतो. अश्या वेळी दोन चमचे मेथीदाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवावेत. दुसऱ्या दिवशी हे मेथीदाणे फुलून मऊ झालेले असतील. हे भिजविलेले मेथीदाणे आणि कढीपत्त्याची काही पाने बारीक वाटून घेऊन त्याची पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट केसांना लावून एक तास ठेवावी, त्यानंतर केस धुवून टाकावेत. ही पेस्ट केसांना लावताना केसांच्या मुळांशी देखील लागेल याची काळजी घ्यावी. ह्या पेस्ट मुळे केसांचा कोरडेपणा नाहीसा होऊन केस मुलायम होतील.

अकाली पांढरे झालेले केस पुन्हा काळे होण्यासाठी चार ते पाच चमचे खोबरेल तेलामध्ये कढीपत्त्याची पाने, मेथीची पाने आणि कडुनिंबाची पाने घालावीत. थोडा वेळ हे तेल गरम करून घ्यावे. त्यानंतर गॅस बंद करून तेल थंड होऊ द्यावे. हे तेल गाळून घेऊन केसांना लावावे आणि रात्रभर केसांना राहू द्यावे. दुसऱ्या दिवशी सकाळी केस नेहमीप्रमाणे धुवून टाकावेत. कढीपत्त्याची पाने केसांना आणि केसांच्या मुळांशी वाटून लावली असता, डोक्यातील कोंडा नाहीसा होऊन केस मुलायम आणि सुंदर दिसू लागतात.