मानसिक तणाव ठरू शकतो तुमच्या सौन्दर्याकरिता हानिकारक


आपल्या शारीरिक आणि मानसिक अवस्था आपल्या सौंदर्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करीत असतात. जर तुम्ही सतत मानसिक तणावाखाली राहात असाल, तर त्याचे परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येऊ लागतात. अकाली त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या, त्वचेचा असमान पोत, अॅक्ने, डोळ्यांभोवती काळी वर्तुळे, डोळ्यांच्या खाली सूज दिसणे, केस अकाली पांढरे होणे, गळू लागणे, अशी निरनिराळी लक्षणे मानसिक तणावामुळे उद्भवू शकतात. त्यामुळे चेहऱ्याची रया जाऊन चेहेरा बेरूप दिसू लागतो. तुमचा आहार कितीही संतुलित असला, किंवा तुम्ही कितीही महागडी प्रसाधने वापरली, ब्युटी ट्रीटमेन्ट करविल्या, तरी जर मानसिक तणाव कमी होत नसेल, तर त्याचे दुष्परिणाम चेहऱ्यावर दिसून येतातच. त्यामुळे आपले सौंदर्य जपण्यासाठी शारीरिक स्वास्थ्याप्रमाणेच मानसिक स्वास्थ्याचा विचार केला जाणे गरजेचे आहे. मानसिक ताण संपूर्णपणे टाळता येणे शक्य नसले, तरी तो कमी करता येणे मात्र शक्य आहे. त्यासाठी ध्यानधारणा, व्यायाम, योगसाधना, आपल्या आवडीच्या कामांसाठी आवर्जून वेळ देणे, अश्या गोष्टींचा अवलंब करणे इष्ट आहे.

जेव्हा मानसिक तणाव जास्त असेल, तेव्हा शरीरामध्ये कोर्टीसोल नामक तत्व तयार होत असते. हे तत्व शरीरातील इतर हार्मोन्सचे संतुलन बिघडवते. त्यामुळे त्वचेवर अॅक्ने येऊ लागतात. तसेच त्वचा रुक्ष, रखरखीत होऊ लागते. त्यामुळे त्वचेवर पिगमेंटेशन एखील होऊ लागते. मानसिक तणावामुळे झोप अपुरी होते. त्यामुळे डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे येणे, डोळ्यांच्या खाली सूज येणे, अश्या तक्रारी उद्भवू लागतात. मानसिक तणावामुळे पाणी पिण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होऊन त्वचा कोरडी पडू लागते. त्यामुळे त्वचेवर अकाली सुरकुत्या पडू लागतात.

मानसिक तणावामुळे केस अकाली पिकू लागतात, यांची गळती सुरु होते. तणावामुळे हेअर फॉलिकलच्या वाढीवर परिणाम होऊन ते कमजोर होऊ लागतात, परिणामी केस गळती सुरु होते. तसेच मेलानिनचे प्रमाण कमी होऊन केस अकाली पांढरे होऊ लागतात. केसांच्या मुलांशी सीबम गोळा झाल्याने डोक्यामध्ये कोंडा होऊ लागतो.

हे सर्व दुष्परिणाम टाळण्यासाठी काही उपायांचा अवलंब करता येईल. संतुलित आहार, नियमित व्यायाम ह्यामुळे मानसिक तणाव काही अंशी कमी करता येऊ शकतो. तसच ध्यानधारणा, योगसाधना केल्याने देखील स्ट्रेस कमी करता येतो. मानसिक तणाव कमी करण्यासाठी वेळशीर आणि आवश्यक तेवढी झोप मिळणे आवश्यक आहे. आपल्या आहारातील कॅफिनचे प्रमाण कमी केल्याने देखील मन शांत राहण्यास मदत होते. त्वचेची देखभाल करण्यासाठी शक्यतो नैसर्गिक साहित्य असलेल्या प्रसाधनांचा उपयोग करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment