ताण कमी करायचाय तर फेसबुक सोडा – संशोधकांचा दावा


तुम्हाला ताण-तणाव कमी करायची इच्छा असेल, तर आजच फेसबुक सोडा असा दावा एका ताज्या संशोधनातून करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथील क्वीन्सलँड विद्यापीठातील संशोधकांच्या एका चमूने हे संशोधन केले आहे. या विद्यापीठातील मानसशास्त्र शाखेतील वरिष्ठ प्राध्यापक एरिक व्हॅनमन यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. फेसबुक सोडल्यामुळे वापरकर्त्यांच्या ताण-तणावावर आणि संपूर्ण आरोग्यावर काय परिणाम होतो, याची त्यांनी अभ्यास केला.

जर्नल ऑफ सोशल सायकोलॉजी या नियतकालिकात नुकतेच हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. फेसबुकच्या इतिहासातील सर्वात मोठी डाटा चोरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केम्ब्रिज अॅनालिटिका स्कॅंडलनंतर अनेक लोकांनी फेसबुकवरील खाते बंद केले होते. त्या पार्श्वभूमीवर या संशोधनाला महत्त्व आले आहे.

प्रा. व्हॅनमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फेसबुकच्या सक्रिय वापरकर्त्यांपैकी एकूण 138 जणांची दोन गटांत तपासणी केली. यातील एका गटाला 5 दिवस फेसबुक वापरण्यास मनाई करण्यात आली होती, तर दुसरा गट नेहमीप्रमाणे फेसबुक वापरत राहिला.

“केवळ 5 दिवस फेसबुक न वापरण्यामुळे त्या व्यक्तींच्या शरीरातील ताण-प्रेरक कॉर्टिसॉल या संप्रेरकाची पातळी घसरली,” असे प्रा. व्हॅनमन म्हणाले.

Leave a Comment