‘स्टार इंडियाकडे क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क


मुंबई : भारतात होणा-या द्विदेशीय क्रिकेट मालिकांच्या तसेच देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क स्टार इंडियाने ६१३८.१ कोटी रुपये या विक्रमी किमतीला मिळविले आहेत. त्यांना हे पुढील पाच वर्षासाठी हक्क मिळाले आहेत.

प्रसारण हक्कासाठी गेले तीन दिवस ई-लिलाव घेण्यात आला होता. भारतातील क्रिकेट प्रसारणाचे हक्क मिळाल्यामुळे स्टारची आता विश्व क्रिकेट प्रक्षेपणात मक्तेदारी निर्माण झाली आहे. त्यांनी याआधीच आयपीएलचे हक्कही १६३४७ कोटी रुपयांना विकत घेतलेले आहेत. याशिवाय त्यांनी आयसीसीच्या सर्व स्पर्धांचे (महिला व पुरुष विश्वचषक आणि टी-२० विश्वचषक) प्रक्षेपण हक्कही मिळविलेले आहेत. त्यांना या हक्कानुसार भारतीय उपखंड व उर्वरित विश्वातील टीव्ही प्रक्षेपणाचे व डिजिटल हक्क मिळाले आहेत. भारतीय संघाचे पुढील पाच वर्षाच्या कालावधीत तीनही प्रकारांत मिळून एकूण १०२ सामने होणार आहेत.

स्टारसह या लिलावात सोनी व रिलायन्सच्या जिओ कंपनीने भाग घेतला होता. या तिघांत हक्क खरेदीसाठी जबरदस्त चढाओढ लागली होती. ४४४२ कोटी रुपयांवर ई-लिलावाच्या पहिल्या दिवशी बोली थांबली होती तर दुस-या दिवशी ६००० कोटीचा टप्पाही ओलांडला गेला होता. त्यांच्या चढाओढीत बीसीसीआयची मात्र चांदी झाली असून ‘बिलियन डॉलर’चा करार त्यांच्या हाती पडला आहे.

Leave a Comment