जगातील सर्वात महाग फळे


आपल्या जगामध्ये अशीही काही फळे अस्तित्वात आहेत, ज्यांची किंमत सामान्य माणसाला परवडण्याजोगी नाही. ही फळे जगातील सर्वात महागडी फळे म्हणून ओळखली जातात. ह्या फळांचे भाव ऐकून सर्वसामान्यांना धक्का बसल्या शिवाय राहणार नाही. जगातील अनेक चैनीच्या महागड्या वस्तूंपेक्षा देखील या फळांच्या किंमती जास्त आहेत असे म्हटले, तर तुमचा विश्वास बसणार नाही. जगातील या ‘राजेशाही ‘ फळांच्या बद्दल माहिती खास ‘माझा पेपर’च्या वाचकांसाठी.

हॉन्गकॉन्ग येथे मिळणारे ‘ ट्रफल व्हाईट अल्बा मशरूम्स ‘ हे फळ कोण्या राजा-रजवाड्याच्या घरीच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हे फळ अतिशय दुर्लभ असून, या फळाची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. हे फळ खरेदी करण्यासाठी चक्क बोली लावली जाते. ज्याची बोली सगळ्यात महाग असेल, त्याला हे फळ विकले जाते. नुकत्याच पार पडलेल्या एका निलामी मध्ये तब्बल ७५,००० युरो, म्हणजेच ६०,१०,२८६ रुपये इतक्या किंमतीला ८५० ग्राम वजनाची ही फळे विकली गेली. अलीकडच्या काळामध्ये या फळांना मिळालेली हे सर्वाधिक किंमत असल्याचे बोलले जात आहे.

‘युबरी’ नामक खरबुजाच्या प्रजातीबद्दल तुम्ही कदाचित ऐकले नसेल. ह्या खरबुजांचे उत्पादन जपान देशामध्ये होते. ही खरबुजे अतिशय अवीट गोडीची, अतिशय चविष्ट, रसदार असतात. या सारखे फळ इतरत्र मिळत नाही, म्हणूनच या जातीच्या एका खरबूजाची किंमत सुमारे पंधरा लाख रुपये इतकी आहे. जपानमध्ये आवडीने खाल्ले जाणारे असे हे फळ आहे.

तसेच जपान मध्ये मिळणारे आणखी एक महागडे फळ म्हणजे ‘रुबी रोमन’ जातीची द्राक्षे. ह्या द्राक्षांच्या एका घडाची किंमत सुमारे पावणे तीन लाख रुपये इतकी असून एका घडामध्ये केवळ तीस ते पस्तीस द्राक्षे असतात. यातील एका द्राक्षाचे वजन सुमारे वीस ग्राम इतके असते.

‘तइयो नो तामागो ‘ , म्हणजेच ‘सूर्याचे अंडे’ असे नाव असणारा आंबा रंगाने सूर्याप्रमाणेच केशरी, सोनेरी दिसतो. ह्या आंब्यांच्या एका जोडीची किंमत दोन लाख रुपये आहे. ह्या आंब्याचा आकार एका विशालकाय अंड्याप्रमाणे दिसतो. ह्या फळाची पैदास देखील जपानमध्ये केली जाते. हे फळ अतिशय महाग असल्यामुळे सहसा खाल्ले जात नाही, म्हणूनच ह्या फळाची पैदास देखील कमी प्रमाणातच केली जाते.

‘ स्क्वेअर मेलन ‘, म्हणजे आकाराने चौकोनी असणारे कलिंगड, हे देखील जपानमध्ये मिळणारे फळ आहे. एका चौकोनी कलिंगडाची किंमत सुमारे ५३ हजार रुपये आहे. ह्या कलिंगडाचे वजन पाच किलोंपेक्षा अधिक असते. ह्या कलिंगडाचा आकार चौकोनी कसा, तर ही कलिंगडे चौकोनी आकारांच्या कंटेनरमध्ये वाढविली जातात. कंटनेर मध्ये वाढविण्याचे कारण हे, की गोल कलिंगडाच्या मानाने चाकोनी कंटेनरमधील कलिंगड उचलून नेण्यास सोपे असते.

Leave a Comment