व्हिडीओकॉनला ३२५० कोटींचे कर्ज दिल्याने चंदा कोचर अडचणीत


मुंबई – आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर व्हिडीओकॉन समुहाला ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याने अडचणीत आल्या आहेत. २००८ मध्ये चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्यासोबत व्हिडीओकॉन समुहाचे अध्यक्ष वेणुगोपाळ धूत यांनी एक कंपनी सुरु केली होती आणि धूत यांनी आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज मिळताच अवघ्या ९ लाख रुपयांमध्ये दीपक कोचर यांना ती कंपनी विकल्याचे समोर आले आहे. आता तपास यंत्रणांच्या रडारवर हे सर्व व्यवहार आले आहेत.

याबाबतचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिेले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार दीपक कोचर आणि वेणुगोपाळ धूत यांनी डिसेंबर २००८ मध्ये न्यू पॉवर रिन्यूएबल्स (एनआरपीएल) ही कंपनी सुरु केली होती. धूत यांच्याकडे या कंपनीत ५० टक्के समभाग होते. तर उर्वरित समभाग दीपक कोचर यांच्या कंपनीकडे होते. या कंपनीचे नाव पॅसिफिक कॅपिटल असे असून दीपक कोचर यांच्या वडिलांकडे या कंपनीची मालकी आहे. तर या कंपनीत चंदा कोचर यांच्या भावाची पत्नी देखील सक्रीय आहेत.

धूत यांनी एनआरपीएलच्या संचालकपदाचा जानेवारी २००९ मध्ये राजीनामा दिला आणि कोचर यांना कंपनीचे शेअर्स २. ५ लाख रुपयांमध्ये विकले. मार्च २०१० मध्ये न्यू पॉवरला धूत यांची मालकी असलेल्या सुप्रीम एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून ६४ कोटी रुपयांचे कर्ज घ्यावे लागले. यानंतर मार्च २०१० च्या अखेरपर्यंत न्यू पॉवरमधील ९४.९९ शेअर्सचा वाटा सुप्रीम पॉवरकडे गेला.

धूत यांनी नोव्हेंबर २०१० मध्ये सुप्रीम एनर्जीचे मालकी हक्क महेश पुगलिया यांच्याकडे दिले. पुंगलिया यांनी हीच कंपनी एप्रिल २०१३ मध्ये दीपक कोचर मॅनेजिंग ट्रस्टी असलेल्या ‘पिनॅकल’च्या ताब्यात दिली. विशेष म्हणजे ही कंपनी अवघ्या ९ लाखांमध्ये विकण्यात आली. एकीकडे हे व्यवहार होत असतानाच दुसरीकडे व्हिडीओकॉन समुहाला ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज चंदा कोचर मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या आयसीआयसीआय बँकेने दिले. हे कर्ज एप्रिल २०१२ मध्ये देण्यात आले होते. यातील २,८१० कोटी रुपयांचे थकीत होते. हे २०१७ मध्ये बुडीत कर्ज म्हणून जाहीर करण्यात आले.

आता कोचर कुटुंबीय आणि धूत यांच्यातील हे सर्व व्यवहार आणि बँकेचे बुडालेले कर्ज हे संशयाच्या भोवऱ्यात आले आहे. या व्यवहारांची तपास यंत्रणांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. याबाबत आयसीआयसीआय बँकेने प्रतिक्रिया दिली आहे. आर्थिक हितसंबंधांचा प्रश्नच निर्माण होत नाही. या सर्व अफवा असून चंदा कोचर यांच्यावर बँकेच्या संचालक मंडळाचा विश्वास आहे. अशा अफवा बँकेची प्रतिमा मलिन करण्यासाठीच पसरवल्या जात असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. तर हे आरोप वेणूगोपाल धूत यांनी देखील फेटाळून लावले आहेत.

Leave a Comment