रेनॉड्स डिसीजबद्दल काही तथ्ये


थंडीचा मोसम सुरु झाला आणि तापमानाचा पारा खाली उतरू लागला की गारठा जाणवायला लागतो. हातापायांची बोटे गार पडू लागतात. ही बाब अगदी सामान्य आहे. पण काही लोकांच्या हातापायांची बोटे, किंवा संपूर्ण हातपाय, तापमान फार कमी नसताना देखील गार पडत असतात. ह्या परिस्थितीला रेनॉड्स डिसीज म्हटले गेले आहे. ही व्याधी महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. त्याचप्रमाणे थंड हवेच्या ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत हा आजार जास्त आढळून येतो.

ह्या व्याधीमध्ये त्वचेला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे शरीराच्या विशिष्ट भागांमध्ये रक्ताभिसरण अपुरे होत असते. हे विशेष करून हातापायांच्या बोटाच्या बाबतीत घडत असते. थंडी वाजल्यामुळे, किंवा मानसिक तणावामुळे हातापायांची बोटे थंड पडू लागतात. बोटे इतकी थंड पडतात, की त्यांच्यावर पांढरी किंवा निळसर झाक दिसू लागते. जसजसे रक्ताभिसरण पूर्वपदाला येते, तसतश्या बोटांमध्ये वेदना, कळा येण्याला सुरुवात होते. क्वचित बोटांवर सूजही आढळते.

ह्या व्याधीची काही विशेष लक्षणे आहेत. ह्या लक्षणावरून ह्या व्याधीचे निदान होऊ शकते. ही व्याधी असणाऱ्यांच्या हातांच्या तळव्यांचा रंग अचानक बदलतो. तळवे अचानक पांढरे फटक, किंवा एकदम लाल दिसू लागतात. काही वेळाने हातांच्या तळव्यांचा रंग पूर्ववत होतो. ह्या व्यक्तींच्या हातापायांची बोटे इतकी थंड पडतात, की हातामध्ये हातमोजे आणि पावले पायमोज्यांनी झाकण्यावाचून यांच्याकडे इतर कोणताच पर्याय नसतो. विशेषतः वातानुकुलीत खोलीमध्ये किंवा ऑफिसमध्ये बसण्यास खूपच त्रास अश्या व्यक्तींना सहन करावा लागतो.

ह्या व्यक्तींना गरम पाण्याचा पेला किंवा गरम पाण्याची पिशवी हातामध्ये धरली की आराम वाटतो. शीतपेयाची थंडगार बाटली जरी हातामध्ये धरली तरी रुग्णाच्या हाताची बोटे कमालीची गार पडतात, त्यावर सूज येऊ शकते आणि वेदनाही होतात. अश्या व्यक्तींना थंडीचा मोसम नसताना देखील पायामध्ये मोजे घालण्यावाचून पर्याय नसतो. ह्या व्याधीने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी वातानुकुलीत ठिकाणी जाताना विशेष काळजी घेणे अगत्याचे आहे. त्यांनी आपल्या जवळ हातमोजे, पायमोजे बाळगणे आवश्यक आहे. ही व्याधी कधीही आणि केव्हाही डोके वर काढू शकते हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने तयारी ठेवणे रुग्णांसाठी गरजेचे आहे.

Leave a Comment