धर्म ग्रंथांमध्ये वर्णन केलेले काही रहस्यमयी जीव


महाभारत, रामायण, आणि इतर पुराणांमध्ये काही अश्या पशु पक्ष्यांचे वर्णन आहे, जे वास्तवामध्ये खरोखरच अस्तित्वात होते किंवा नाही, हा विचार करण्यासारखा विषय आहे. आजच्या प्रगतीशील वैज्ञानिक युगामध्ये, असे चमत्कारी जीव कोण्या काळी अस्तित्वात असू शकतील ह्यावर विश्वास ठेवणे काहीसे कठीण असले, तरी पौराणिक कथांमध्ये यांचे केलेलं वर्ण विलक्षण आहे हे मात्र सर्वमान्य आहे.

महाभारतामध्ये नागकन्यांचा उल्लेख आहे. अर्जुनाने पाताललोकातील उलूपी नामक नागकन्येशी विवाह केला होता. अर्जुनाशी विवाह करण्यापूर्वी उलुपीचा विवाह एका नागाशी झालेला होता. या नागाचे भक्षण गरुडाने केले होते. अर्जुन आणि उलूपी यांच्या विवाहातून अरावानाचा जन्म झाला. अरावानचे दक्षिण भारतामध्ये मंदिर आहे. भीमाचा पुत्र घटोत्कच याचाही विवाह एका नागकन्येशी झाला होता. तिचे नाव अहिलवती होते. गरुड ही प्रजाती अतिशय बुद्धिवान समजली जात असे. गरुड भगवान विष्णूचे वाहन असून, पुराणामध्ये असलेल्या उल्लेखानुसार गरुड हा एक शक्तिशाली, चमत्कारी आणि आणि रहस्यमयी प्राणी होता. गरुड हा कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी विनिता यांचा पुत्र होता.

पांढरा शुभ्र, भरधाव वेगाने धावणारा, आकाशामध्ये उडू शकणारा उच्चै:श्रवा नामक अश्वाचा पुराणामध्ये उल्लेख आहे. तसेच देव आणि असुर यांनी केलेल्या समुद्रमंथनामध्ये कामधेनु गाय प्रकट झाल्याचा उल्लेख आहे. ही गाय सर्व मनोकामना पूर्ण करणारी असल्याने हिला कामधेनु म्हटले गेले आहे. दैवी शक्ती प्राप्त असलेल्या या गाईचे दुध प्राशन करणाऱ्याला अमृतप्राशनाचा लाभ होत असे. जिथे कामधेनूचा निवास असे, तिथे अन्नधान्याची, समृद्धीची कोणतीच कमतरता नसे असे म्हटले जाई. रामायणामध्ये उल्लेख असलेले संपाती आणि जटायू हे दोन पक्षी विंध्याचल पर्वताच्या पायथ्याशी राहून निशाकर ऋषींची सेवा करीत असत. छत्तीसगडमधील दंडकारण्यामध्ये गिद्धराज जटायुचे मंदिर आहे. पुराणातील मान्यतेनुसार याच अरण्यामध्ये जटायू आणि रावणाचे युद्ध झाले होते.

ऐरावत हे इंद्राचे वाहन असणारा पंधरा हत्ती ‘ इरा ‘ म्हणजे जलातून ( समुद्रातून ) उत्पन्न झाल्यामुळे त्याचे नाव ऐरावत होते. तसेच इरावतीचा पुत्र असल्याने ही याचे नाव ऐरावत असल्याचे म्हटले गेले आहे. हा हत्ती देखील कामधेनुप्रमाणेच समुद्रमंथनातून उत्पन्न झाला. मंथनातून उत्पन्न झालेल्या चौदा रत्नांची वाटणी झाल्यानंतर ऐरावत देवांच्या वाटणीला आला. तसेच विष्णूंची शैय्या असलेला शेषनाग कश्यप ऋषींचा पुत्र होता. अनेक फणे असलेल्या नागाच्या फण्यावर हे पृथ्वी तोलली गेली असल्याची मान्यता आहे.

Leave a Comment