अण्वस्त्रधारी आशिया


दुसर्‍या महायुद्घाची अखेर अणुबॉंबने झाली. १९४३ पासूनच जर्मनी असे काही तरी स्फोटक आणि महासंहारक अस्त्र शोधण्यात गर्क आहे अशी कुणकुण दोस्त राष्ट्रांना लागली होती. तेव्हा जर्मनीने ते अस्त्र शोधण्याच्या आत आपणच ते का शोधू नये असा विचार अमेरिकेने केला. अमेरिकेने अणुबॉंब तयार केला आणि त्याचा पहिला प्रयोग जपानवर केला. तो प्रयोग जर्मनीवर का केला नाही हे काही कळले नाही पण जगातला पहिला आणि आतापर्यंतचा शेवटचा अणुस्फोट जपानमध्ये म्हणजे आशिया खंडात झाला. असे असले तरी अमेरिकेच्या पाठोपाठ अणुबॉंब तयार करण्यात ब्रिटन. फ्रान्स. रशिया, जर्मनी या यूरोपीय देशानीच आघाडी घेतली. १९६० च्या दशकापर्यंत तरी अणुबॉंबधारी देश म्हटल्यावर याच देशाची नावे समोर येत होती आणि त्यात आशियातल्या कोणत्याही देशाचा समावेश होत नव्हता.

आता काय चित्र आहे ? १९६४ साली चीनने अणुबॉंब तयार केला आणि अण्वस्त्रधारी देशांत आशियाई देशाचा समावेश होण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर घडलेल्या घटनांनी आता यूरोप नव्हे तर आशिया खंड अण्वस्त्र धारी होत आहे. चीनच्या पाठोपाठ भारताने १९७४ साली अणु चाचणी घेतली. ही चाचणी घेताना भारताने आपण अण्वस्त्रे बनविणार नाही असा खुलासा केला होता पण कोणताही देश अण्वस्त्रे बनविण्याआधी अशीच सारवासारवी करीत असते. भारताने अशी सारवा सारवी केली आणि १९९८ साली अण्वस्त्रांची चाचणी घेतली. भारताच्या पाठोपाठ पाकिस्ताननेही अण्वस्त्रांची चाचणी घेतली. आशिया खंडात बघता बघता तीन देश अण्वस्त्रधारी झाले.

या तीन देशांच्या पाठोपाठ उत्तर कोरियाचा अण्वसत्रधारी होण्याचा जोरदार प्रयत्न जारी आहे. सार्‍या जगाचा त्याला विरोध आहे पण तो झुगारून उत्तर कोरिया अणुबॉंब तयार करीत आहे. आता आशियातील इस्त्रायलची त्या दिशेने तयारी सुरू झाली आहे. इराणही तसा प्रयत्न करीत आहे. इराण आणि सौदी अरबस्तान यांच्यात मध्य पूर्वेत वर्चस्व प्रस्थापित करण्याची चढाओढ चाललेली असते. तेव्हा इराणने तयारी सुरू करताच सौदी अरबस्ताननेही अण्वस्त्रे तयार करण्याचा इशारा दिला आहे. तशी तयारीही सुरू केली आहे आणि कोणताही देश करतो तशी आपला हा कार्यक्रम शांततेसाठी आहे अशी मखलाशीही केली आहे. पण एकंदरित पावले मात्र त्याच दिशेने पडत आहेत. येत्या दशकात आशिया खंडात किमान सात देश अण्वस्त्रधारी झालेले असतील. या खंडाच्या शांततेला हा फार मोठा धोका आहे.

Leave a Comment