नारळाबद्दल पुराणांमध्ये सांगितलेली काही रोचक तथ्ये


नारळाचे पूजा पाठामध्ये किंवा धार्मिक कार्यांमध्ये मोठे महत्व आहे, हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. कोणतेही शुभकार्य असले, तरी त्यासाठी नारळ हवाच. पुराणांमध्ये देखील नारळाचे महत्व सांगितले गेले आहे. देवाला नारळ चढविल्यास धन, समृद्धी प्राप्त होत असून, नारळातील खोबऱ्याचे सेवन प्रसाद म्हणून केल्यास शारीरक दुर्बलता, व्याधी दूर होत असल्याचा उल्लेल्ख पुराणांमध्ये आहे. अशीच आणखी काही रोचक तथ्ये..

नारळाचा उल्लेख श्रीफल म्हणूनही केला जातो. असे म्हणतात की जेव्हा भगवान विष्णूंनी धरेवर अवतार घेतला, तव्हा त्यांनी आपल्यासमवेत तीन गोष्टी आणल्या. लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनु. नाराळाच्या वृक्षाला कल्पवृक्ष म्हटले गेले आहे. या दिव्य वृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीनही देवतांचा वास असल्याचे म्हटले जाते. श्रीफल भगवान शंकरांचे आवडते आहे. नारळावर असलेल्या तीन डोळयांना शंकरांचे त्रिनेत्र समजले जाते.

पुराणामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे स्त्रियांनी नारळ फोडणे वर्जित मानले जात असे. ह्या संबंधीची मान्यता अशी, की नारळ हा बीजरूप आहे. त्यामुळे नारळाचा संबंध प्रजननक्षमतेशी जोडला गेला आहे. स्त्री ही प्रजननकारक असल्यामुळे स्त्रियांनी बीजरूपी नारळ फोडू नये अशी मान्यता प्राचीन काळामध्ये होती. त्यामुळे देवतांना अर्पण केल्यानंतर नारळ फोडण्याचे काम केवळ पुरुषांनाच करण्याची अनुमती असे. नारळाच्या पाण्याने देवतांना अभिषेक करण्याचा देखील प्रघात असे.

देवतांसमोर नारळ फोडणे म्हणजेच आपल्यामध्ये असलेल्या दुष्ट प्रवृत्ती, अहंकार यांचा नाश करणे अशी मान्यता असल्यामुळे देवाला नारळ फोडूनच अर्पण करण्याची पद्धत असे. तसेच मारुतीच्या मंदिरामध्ये नारळ आपल्या शिराभोवती सात वेळा फिरवून फोडल्याने इतरांची आपल्याला लागलेली नजर किंवा दृष्ट संपुष्टात येते अशी मान्यता असे.