उ.प्र.मध्ये नवे समीकरण


उत्तर प्रदेेशातल्या लोकसभेच्या दोन जागांचे निकाल हे अनेक अर्थांनी ऐतिसाहिक आहेत. या पोटनिवडणुकांत भाजपाचा दोन्ही जागांवर पराभव झाला आहे. यातल्या एका जागेवर उपमुख्यमंत्री तर दुसर्‍या जागेवर मुख्यमंत्री निवडून आले होते. म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना आपल्या जागा राखता आल्या नाहीत. ते सध्या सत्तेवर असताना आणि भारतीय जनता पार्टीचा विजयी घोडा अन्य राज्यांता चौखुर सुटलेला असताना त्याचा या सुरक्षित जागांवर पराभव व्हावा हे भाजपासाठी मोठेच धक्कादायक आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याने मोकळया झालेल्या जागेवर पोट निवडणूक झाल्यावर कधी पराभव होत नसतो. पण येथे ही जागा पूर्वी सलग पाच वेळा जिंकलेली असतानाही पक्षाच्या तेजीच्या काळात पराभव झाला आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

हा पराभव का झाला ? याचा विचार केला असता असे लक्षात येते की या पोट निवडणुकीत राज्यात नवे जातीय समंीकरण उदयाला आले आहे. या पूर्वीच्या सगळ्या निवडणुकांत असे दिसून आले आहे की या राज्यात प्रत्येक वेळी नवे समीकरण जन्माला येत असते. गेल्या तीन दशकाहूनही अधिक काळ राज्यात सपा आणि बसपा हे दोन पक्ष परस्परांना शह देत आले आहेत. राज्यातल्या कोणत्याही निवडणुकीत या दोन पक्षांतच पहिल्या आणि दुसर्‍या क्रमांकाविषयी स्पर्धा चालत असते. असे हे दोन आघाडीचे पक्ष आपले जुने वैर विसरून तिसर्‍या क्रमांकावर राहणार्‍या पक्षाच्या विरोधात एक झाले आहेत. त्याचा परिणाम भाजपाला भोगावा लागला.

आता पर्यंत न दिसलेले हे समीकरण असेच राहिले आणि येत्या लोकसभा निवडणुकीत त्यासह भाजपाशी लढा दिला गेला तर भाजपाचा पराभव करणे या समीकरणाला शक्य होणार आहे. या नव्या समीकरणाने भाजपा विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आजवर भाजपाला आणि मोदी यांना पर्याय नाही असे समजले जात होते पण या समजाला या समीकरणाच्या यशाने धक्का दिला आहे. या दोन्ही निवडणुकांत कॉंग्रेसला फार दयनीय मते मिळाली आहेत पण तरीही भाजपाचा कोणीतरी पराभव करीत आहे या शक्यतेने कॉंग्रेस नेते आनंदले आहेत. म्हणूनच सोनिया गांधी यांनी या पोट निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर मेजवानी देऊन आपला आनंद व्यक्त केला. भाजपाला या पराभवाने धक्का दिला आहे. आता भाजपाला आपला करिष्मा दाखवण्यासाठी कर्नाटक विधानसभा निवडणुकीची वाट पहावी लागत आहे.

Leave a Comment