पंजाब नॅशनल बँकेतील 11 हजार कोटी रुपयांचा घोटाळा ही अपवादात्मक घटना असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रमुख रजनीश कुमार यांनी म्हटले आहे. तसेच सरकारी बँकेचे खासगीकरण करण्यासही त्यांनी विरोध दर्शविला.
पीएनबीमधील घोटाळा अपवादात्मक घटना – एसबीआय प्रमुख
“पीएनबीमधील घोटाळा ही अपवादात्मक घटना होती आणि त्याबद्दल माध्यमांमध्ये उडालेला गदारोळ व नकारात्मक अनावश्यक होते,” असे रजनीश एनडीटीव्ही वाहिनीशी बोलताना म्हणाले. मात्र या घोटाळ्याने बँकेच्या प्रतिमा डागाळल्या असल्याचे त्यांनी मान्य केले.
सरकारी बँकांमध्ये घोटाळे होतात, हे विधान खोडून काढताना ते म्हणाले, “खासगी क्षेत्रातील 100 टक्के बँकांमध्ये एकसमान नैतिक दर्जा आणि कारभार आहे, असे म्हणता येईल का? कारभार सुधारण्याची गरज आहे हे मला मान्य आहे, परंतु फक्त सरकारी बँकांनी सुधारायला हवे, असे नाही,” असेही ते म्हणाले.
हिरे व्यापारी निरव मोदी याने लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून पीएनबीला 11 हजार कोटी रुपयांचा गंडा घातला. त्यानंतर सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याच्या मागणीने उचल घेतली होती. राहुल बजाज यांच्यासह अनेक उद्योजकांनी या मागणीला पाठिंबा दिला होता. तसेच उद्योगांची संघटना असलेल्या अॅसोचेमनेही ही मागणी केली होती. मात्र फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही मागणी फेटाळून लावली होती.