प्रचंड आशावादी संशोधक


खरे तर जन्माला येणार्‍या प्रत्येकालाच एक दिवस मरायचे असते. पण म्हणून काही कोणी मरणाच्या भीतीखाली जगत नसतो कारण मरायचे असले तरीही आपल्या मरणाला अजून अवकाश आहे हे त्यांना माहीत असते. मात्र कधी तरी मरणाची चाहूल खरोखर लागतेच. ती लागते तेव्हा लोक किती व्याकूळ होतात. किती निराश होतात याचे आपण नेहमीच दर्शन घेत असतो पण कालच निधन झालेले श्रेष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकींग यांना खरेच मरणाच्या पन्नास वर्षे आधी त्याची चाहूल लागली होती. सारे शरीर लुळे पडण्याचा आजार जडला असल्याने झिजून झिजून मरणे आपल्या नशिबाला आहे याची जाणीव त्यांना झाली होती पण तरीही त्या भीतीचा लवलेशही मनात न ठेवता ते पंचाहत्तर वर्षाचे आयुष्य विलक्षण सक्रियतेने जगले.

विसाव्या शतकातला सर्वात श्रेष्ठ शास्त्रज्ञ म्हणून अल्बर्ट आइन्स्टाईन याचे नाव घेतले जाते. या शतकातला सर्वात श्रेष्ठ शास्त्रज्ञ म्हणून स्टीफन हॉकिंग यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. आइन्स्टाईनच्या जन्माच्या दिवशीच स्टीफन हॉकिंग याचा मृत्यू झाला आहे. नियतीला यातून काहीतरी सांगायचे आहे. आइन्स्टाईन जीवनाविषयी बोलताना म्हणत असत. जीवन आनंदी नाही पण आपण ते आनंदाने जगले पाहिजे. तसे आपल्याला जगता आले पाहिजे. स्टीफन हॉकिंग हे आइन्स्टाईनचा हा विचार आपल्या आयुष्यात उतरवून जगून दाखवत होते. अजीबात सुखाने जगू नये अशी स्थिती असताना ते आनंदात जगत होते.अशा मरणाच्या दाढेतही ते जगाच्या निर्मितीची भाकिते करून प्रचलित कल्पनांना हादरे देणारे अनेक प्रबंध सादर करीत होते. यातच त्यांची जीवनेच्छा किती बळकट होती आणि त्यांची विचारसरणी किती सकारात्मक होती हे कळते.

काही दिवसांपूर्वीच त्यांनी येत्या दशकात कोणत्या तरी परग्रहावरचा माणूस सदृश्य प्राणी आणि पृथ्वीवरचा माणूस यांच्यात संपर्क प्रस्थापित होऊ शकेल असे मत मांडले होते. हा संपर्क कसा होईल हे त्यांनी तपशीलवार सांगितले नाही पण जीवनाच्या शेवटच्या टप्प्यातही ते काही तरी चिंतन करीत होते आणि काही नवी प्रमेये मांडण्याच्या मन:स्थितीत होते असे दिसून येते. स्टीफन हॉकिंगला विसाव्या शतकातला न्यूटन असे म्हटले जाते. यामागेही काही कारणे आहेत. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत प्रस्थापित केला, त्यामुळे मानवतेच्या भवितव्यावर दीर्घकालीन परिणाम झाला. तसा परिणाम स्टीफन हॉकिंगच्या काही शोधांनी लागण्याची शक्यता शास्त्रज्ञांना वाटत असे म्हणून त्यांना विसाव्या शतकातला न्यूटन म्हटले जाते.

Leave a Comment