आंदोलन आणि शिस्त


आपल्या देशात आंदोलन म्हणजे गोंधळ आणि बेशिस्त असे समीकरणच तयार झाले आहे. राजकीय कार्यकर्ते काहीतरी आंदोलन करणार असे कळले तर व्यापारी टरकून असतात. कोणत्या वेळी आंदोलनकर्ते चवताळतील आणि गोंधळ सुरू करतील याचा नेम सांगता येत नाही. पण गेल्या दोन तीन वर्षात निदान महाराष्ट्रातले तर चित्र बदलत चालले आहे. आंदोलनात सहभागी होणारे कार्यकर्ते शिस्तीने वागायला लागले आहेत. आपल्या आंदोलनाने लोकांना त्रास झाला तर त्या लोकांत आपल्या आंदोलनाविषयी, त्याच्या हेतूविषयी आणि आपल्या संघटनेविषयी दुरावा निर्माण होतो आणि आंदोलनाला जनतेचा सहभागही लाभत नाही हे आता कार्यकर्ते आणि नेते यांच्या लक्षात यायला लागले आहे.

म्हणून काल मुंबईत आलेल्या शेतकरी मार्चच्या शिस्तीचे सर्वत्र कौतुक झाले. विशेषत: हा मार्च प्रामुख्याने आदिवासी आणि शेतकरी यांचा होता. ते महामार्गावरून येताना मुख्य रस्त्याने आले तर महामार्गावरची वाहतूक विस्कळीत होईल म्हणून त्यांनी महामार्गावरून जाताना सर्व्हिस रोडचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला या लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यांच्या मार्चमुळे दहावीच्या परीक्षा देणार्‍या मुलांंना त्रास होण्याची शक्यता आहे असे दिसताच त्यांनी रात्रीतून २० किलो मीटर्सचे अंतर कापून मुंबई गाठली. आपल्या आंदोलनाचा कोणालाही त्रास होऊ नये याबाबतची त्यांची तत्परता पाहून लोकांचे डोळे भरून आले. लोकांना त्यांचे कौतुक वाटले.

महाराष्ट्रात निघालेल्या मराठा समाजाच्या मूकमोर्चांनी ही प्रथा पाडली. मोर्चात एकदाही घोषणा दिल्या नाहीत पण घोषणा न देताही आपल्या मागण्यांचे गांभीर्य सरकारच्या लक्षात आणून देता येते हे या मूकमोर्चांनी सिद्ध केले. गेल्याच महिन्यात औंरंगाबाद येथे झालेल्या मुस्लिम समाजाच्या मेळाव्यातही अशीच शिस्त पहायला मिळाली. या मेळाव्याच्या कार्यकर्त्यांनी आणि स्वयंसेवकांनी पोलिसांचे सहकार्य न घेता सगळी व्यवस्था छान हाताळली. त्याचेही कौतुक झाले. आता महाराष्ट्रात आणि एकुणच देशात आंदोलन काढून गोंधळ घालणार्‍या संघटनांनी हा पायंडा पाळावा आणि आंदोलन म्हणजे गोंधळ हे समीकरण मोडून टाकावे. विशेषत: आंदोलनकर्ते जेव्हा रेल्वेने प्रवास करतात तेव्हा तर ते आरक्षणाची ऐसी तैसी करून टाकतात. अशा दिवशी प्रवास करणे हे दिव्य ठरते. हा अनुभव आता येता कामा नये. हा गांेंधळ स्वयंशिस्तीनेच संपेल.

Leave a Comment