‘बार्बी’ या बाहुली बद्दलची ही तथ्ये तुम्हाला माहित आहेत काय?


लहान मुला-मुलींची आवडती बार्बी ही बाहुली ९ मार्च १९५९ रोजी अस्तित्वात आली. मॅटेल कंपनीच्या अध्यक्षा आणि बार्बीच्या निर्माणकर्त्या रुथ हँडलर यांनी अमेरिकन इंटरनॅशनल टॉय फेअरमध्ये ही बाहुली सर्वप्रथम जगासमोर सादर केली. रुथ यांनी आपल्या लहानग्या मुलीला अनेकदा कागदाने बनविलेल्या बाहुल्यांशी खेळताना पहिले होते. त्या कागदी बाहुल्या पाहून एक थ्री डायमेंशनल बाहुली तयार करण्याची कल्पना रुथ याच्या मनामध्ये आकार घेऊ लागली. जर्मनीमध्ये १९५२ साली वर्तमानपत्रांतून प्रदर्शित होत असलेल्या कॉमिक स्ट्रीप मधील ‘ बिल्ड लिली ‘ नामक बाहुलीवरून प्रेरणा घेत, तिच्याचसारखी दिसणारी बार्बी बाहुली तयार करण्यात आली. ही ‘लिली’ बाहुली रुथने, ती युरोपमध्ये गेलेली असताना प्रथम पाहिली होती, आणि त्यावरूनच त्यांनी तयार केलेली बाहुली कशी दिसायला हवी याचे एक पक्के चित्र त्यांच्या मनामध्ये स्पष्ट होत गेले.

बार्बीचे नामकरण रुथ आणि त्यांची मुलगी बार्बरा यांच्या नावांवरून करण्यात आले. त्यानंतर ‘केन’ हा बाहुला बार्बीचा भाऊ म्हणू अस्तित्वात आणला गेला. त्याचे केन हे नाव रुथचा मुलगा केनेथ याच्या नावावरून ठेवण्यात आले होते. आता बार्बी आणि केनची जोडी एखाद्या ‘कपल’ प्रमाणे पहिली जात असली, तरी मुळात केन हा बार्बीचा भाऊ म्हणून तयार करण्यात आला होता.

बार्बी या बाहुलीचा काल्पनिक आयुष्यपट रँडम हाऊस नामक प्रकाशनाने पुस्तकरूपात १९६० साली प्रकाशित केला. यामध्ये बार्बी, तिचे आई-वडील, भाऊ यांचा उल्लेख आहे. बार्बी आणि केन बाहुली-बाहुल्याच्या रुपात अस्तित्वात आले आणि त्यांनी खूप लोकप्रियता देखील मिळविली, पण बार्बीचे आई-वडील , जॉर्ज आणि मार्गारेट यांच्या नावे बाहुल्या मात्र अद्याप तयार करण्यात आल्या नाहीत. बार्बीची सात भावंडे असून, स्कीपर या बाहुल्याचे निर्माण १९६४ साली करण्यात आले. टॉड आणि टूटी ही बार्बीची जुळी भावंडे १९६५ पासून १९७१ सालापर्यंत अस्तित्वात होती. १९९० साली स्टेसी ही बाहुली बाजारामध्ये उपलब्ध झाली, तर केली नामक बाहुली १९९४ पासून २०१० पर्यंत उपलब्ध होती. २०११ साली केली बाहुलीची जागा चेल्सी या बाहुलीने घेतली. बार्बीची सर्वात ‘धाकटी बहिण’ क्रिसी ही बाहुली बार्बी आणि केन सोबत एका सेट मध्ये विकली गेली.

Leave a Comment