नवे वाचाळवीर


सतत वादग्रस्त विधाने करून माध्यमांना खाद्य पुरवणारे दिग्विजयसिंग, सुब्रमण्यम स्वामी, साक्षी महाराज वगैरे मंडळी आता थकली आहेत. पण लोकांनी निराश होण्याचे कारण नाही. त्यांची जागा घ्यायला पूनम महाजन, कमल हसन वगैरे लोक तयारच आहेत. त्यांनी गेल्या दोन तीन दिवसात आपण या लोकांची जागा घ्यायला पूर्णपणे सक्षम आहोत हे दाखवून देण्यात कसलीही कसर ठेवलेली नाही. बेजबाबदारपणे बोलणे आणि आपल्या अधिकारात नसलेल्या विषयावर टिप्पणी करणे यात आपणही वरचढ आहोत हे या दोघांनी पुरेपूरपणे दाखवून दिले आहे. पूनम महाजन या प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. त्या खासदार झाल्यापासून काही बोलल्या नव्हत्या पण आता त्यांना अचानकपणे कंठ फुटला आहे.

पूनम महाजन यांना कदाचित माहीत नसेल पण त्यांचे पिताजी फार जपून आणि नियोजन करून एखादे विधान करीत असत. भाषणात त्यांनी उच्चारलेल्या प्रत्येक वाक्यामागे काही तरी चिंतन असे. आपण या संदर्भात नेमके काय बोलावे आणि कसा शब्दप्रयोग करावा म्हणजे त्याचा विपर्यास करण्याची कोणालाही संधी मिळणार नाही यावर त्यांनी विचार केलेला असे. पण त्यांच्या कन्या साहित्यिकांनी काय बोलावे आणि काय बोलू नये यावर त्याना हितोपदेश करायला लागल्या आहेत. आपला साहित्यिक म्हणून काय अधिकार आहे याचा तरी त्यांनी विचार करायला हवा. काल त्यांनी शेतकर्‍यांच्या लॉंग मार्च मागे नक्षलवाद्यांचा हात आहे काय याचा तपास केला पाहिजे असे विधान केले. या विधानामागे कसलेही चिंतन नाही की विवेक नाही. शेतकरी मार्च हा विषय राजकीय दृष्ट्या किती संवेदनशील आहे याचा विचार करून पोराठोरांनी त्यावर काही बोलायला नको हेही त्यांंना कळत नाही. याचे नवल वाटते.

कमल हसन यांनी आता राजकारणात प्रवेश करण्याचे जाहीर केले आहे आणि आपल्या पहिल्याच विधानात आपण राजकारणात कसे अपात्र आहोत हे दाखवून दिले आहे. त्यांनी जी एस टी कर केराच्या टोपलीत फेकून देण्याच्या लायकीचा असल्याचे ठोकून दिले आहे. कमल हसन हे काही करसल्लागार किंवा तज्ञ नाहीत. पण त्यांनी आपली औकात नसलेल्या विषयाला हात घातला आहे आणि तोही घालताना एखादे विधान सांभाळून करावे एवढेही तारतम्य ठेवलेले नाही. बरे एवढे विधान केलेच आहे तर त्याचे काही विश्‍लेषण करावे तर तेवढेही पथ्य पाळलेले नाही. अर्थात तेवढा अभ्यासही नाही. ठोकून देणारे असे नेते राजकारणाची पातळी खालावण्यास हातभार लावत आहेत.

Leave a Comment