शेतकरी मार्च


नाशिकपासून निघालेला शेतकर्‍यांचा लॉंग मार्च हा सध्या मुंबईला पोचला असल्याने आणि त्यात सहभागी झालेल्या शेतकर्‍यांची संख्या हजारोत असल्याने मुंबईत सध्या तणाव आहे. ज्या लोकांनी हा मोर्चा काढला आहे त्यांनीच पूर्वी शेतकर्‍यांचा संप पुकारला होता. तो फार विचारांती पुकारलेला नसल्याने त्यातून त्यांना जे काही हवे होते ते साध्य झाले नाही. त्या फसलेल्या संपाने सरकारची काही कोंडी झाली नाही. उलट शेतकरीच अडचणीत आले आणि यथावकाश तो संप बारगळला. आता हेच नेते शेतकर्‍यांचा लॉंग मार्च घेेऊन आले आहेत. आता त्यांनी बर्‍यापैकी तयारी केलेली दिसत आहे. काही मागण्या सरकारपुढे ठेवल्या आहेत. त्या मागण्या मान्य झाल्याशिवाय शेतकरी घरी परत जाणार नाहीत असा त्यांचा निर्धार आहे.

या आंदोलनामागे तामिळनाडूतल्या शेतकर्‍यांचे उदाहरण असावे असे दिसते. ते शेतकरी नवी दिल्लीत धरणे धरून बसले होते आणि त्यांनी आपल्या प्रदीर्घ धरण्यात अनेक प्रकारची आंदोलने करून लोकांचे आणि सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता. ही गोष्ट खरी आहे की, शेतकरी फार नाडला आहे. त्याला सातत्याने निसर्गाचे फटके बसत आहेत. त्याला काही तरी दिलासा हवा आहे. सरकारने शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली आहे आणि थोडा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे पण कर्जमाफी हा दिलासा अशाच लोकांना असतो की ज्यांना सोसायटी आणि बँकेतून कर्ज मिळालेले असते. ज्यांना ही कर्जे मिळत नाहीत त्यांना कर्जमाफीतून दिलासा मिळण्याचा काही विषयच नसतो. अशाच शेतकर्‍यांनी या मोर्चात सहभाग नोेंदलेला आहे.

या शेतकर्‍यांची सगळया बाजूंनी कोंडी झालेली आहे. तो केवळ सरकारशीच लढत आहे असे नाही तर तो एकूणच व्यवस्था नावाच्या शत्रूशी लढत आहे. आपल्या व्यवस्थेत आणि समाजा शेतकर्‍यांना प्रतिष्ठा नाही. ज्या जीवनात आसमानी आणि सुलतानीशी सतत लढावे लागत नाही आणि शांत जीवन जगता येते अशा जीवनाची त्याला आस आहे. पण त्याची अशी काही कोेंडी झाली आहे की त्याची शेतीतून सुटकाही होत नाही आणि नव्या स्वस्थ जगण्याची संधीही मिळत नाही. त्याला समाजाने प्रतिष्ठा दिली पाहिजे आणि नवे जीवन जगण्याची संधी दिली पाहिजे. पण शिक्षण, वशिला आणि रोजगार या तिन्ही पातळ्यांवर त्याला सतत उपेक्षाच सहन करावी लागत आहे. त्याच्या मनातली खदखद हेरून त्याला साम्यवादी पक्षाच्या नेत्यांनी आंदोलनास उद्युक्त केले आहे. सरकारला आता त्याच्या जगण्याचा सर्वांगीण विचार करावा लागणार आहे.

Leave a Comment