आदर्श शिक्षण प्रसारक


महाराष्ट्रातले आघाडीचे कॉंग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम यांचे काल निधन झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात ते गेल्या शतकाच्या आठव्या दशकापासून कार्यरत होते. ते पाच वेळा विधानसभेवर निवडून आले होते. त्यांनी जवळ जवळ १५ वर्षे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांत मंत्री म्हणून काम पाहिले होते. विविध खाती हाताळता हाताळता त्यांच्याकडे काही काळ शिक्षण मंत्रीपद तर आलेच कारण त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे काम केलेले होते पण त्यांना काही काळ महसूल खात्याचा कारभार पाहण्याचीही संधी लाभली. या खात्याचे वैशिष्ट्य असे आहे की ते खाते मिळणारा मंत्री ज्येष्ठ मंत्री समजला जातो आणि तो मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पहायला लागतो.

तसे पतंगराव कदम यांचेही स्वप्न मुख्यमंत्री होणे हे होतेच पण त्यांचे ते स्वप्न सत्यात उतरले नाही. मात्र ते आपले हे ध्येय कधी लपवून ठेवत नसत. ते अनेकदा आपली ओळख महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री म्हणून करीत असत. असे असले तरी मुख्यमंत्री होण्यास लागणार्‍या गोष्टींची त्यांच्यात काही कमतरता नव्हती. राज्याचा गाडा हाकण्याची क्षमता त्यांच्यात निश्‍चितच होती पण त्यापायी करावे लागणारे राजकारण त्यांना करता आले नाही. त्यांच्याकडे दबाव गट नव्हता आणि पदाच्या प्राप्तीवर नजर ठेवून पक्षांतरे करण्याची त्यांना सवय नव्हती. अन्यथा महाराष्ट्रात ज्यांना हे पद प्राप्त झाले आहे त्यातल्या बहुतेेकांनी ते पद कॉंग्रेसमध्ये राहून मिळवले पण त्यापूर्वी किंवा नंतर कधी ना कधी ते कॉंग्रेसपासून दूर गेले. शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, वसंतदादा पाटील, बॅ. अंतुले ही त्याची काही उदाहरणे आहेत.

डॉ. पतंगराव कदम हे सुरूवातीपासून कॉंग्रेसमध्ये होते आणि शेवटपर्यंत याच पक्षात राहिले. त्यांच्या राजकीय वाटचालीपेक्षा त्यांची शैक्षणिक कामगिरी अधिक थोर आहे. दुष्काळग्रस्त भागातल्या एका कोरडवाहू शेतकर्‍याच्या कुटुंबात जन्माला आलेले असतानाही त्यांनी गरिबीत दिवस कंठण्यात समाधान न मानता शिक्षण घेतले आणि शिक्षकी पेशा स्वीकारला पण पुढे पुढे त्यांना आपणही शिक्षण संस्था काढावी असे वाटायला लागले. शिक्षकाची नोकरी सोडून देऊन त्यांनी भारती शिक्षण संस्था काढली. जिला पुढे अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्याने ती संस्था भारती विद्यापीठ झाली. हे विद्यापीठ म्हणजे एक साम्राज्य आहे आणि त्याने ग्रामीण भागातल्या हजारो विद्यार्थ्यांना स्वस्तात शिक्षणाची संधी देऊन चांगले जीवन प्राप्त करून दिले आहे.

Leave a Comment