तुमच्या कामाचा ताण तुमच्या खासगी आयुष्यावर दिसून येत आहे का?


तुमच्या कामामुळे असलेला तुमच्या मनावरील ताण तुमच्या खासगी आयुष्यावर नकारात्मक प्रभाव टाकत असतो. आजकालच्या स्पर्धेच्या युगामध्ये काम, व्यवसाय, नोकरी हे सर्वतोपरी आहेत आणि त्याचमुळे काम आणि व्यक्तिगत आयुष्य यांच्यातील संतुलन साधणे काहीसे अवघड होऊन बसले आहे. या कारणामुळे मानासिक तणावाची वाढती कमान पाहायला मिळत आहे. या मनस्थितीचा सर्वात जास्त परिणाम पती-पत्नींच्या दाम्पत्य जीवनावर होत असतो.

कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी किंवा वरिष्ठांशी झालेले मतभेद, वादावादी यांच्यामुळे आपल्या मनामध्ये असंतोषाची, रागाची भावना असते. हा राग घरी पत्नी किंवा पतीवर अथवा मुलांवर काढला जातो. आपल्या असंतोषाला आपला जोडीदार किंवा मुले जबाबदार नाहीत हे समजत असून देखील अनेकदा राग अनावर होतो, आणि त्यापायी घरामध्ये देखील कारणाशिवाय वाद उत्पन्न होतात. अश्यावेळी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देणे हे जरी आवश्यक असले, तरी कुठे थांबायचे हा विचार देखील करणे आवश्यक आहे. तुमच्या मनावरील ताणाचा परिणाम तुमच्या जोडीदारावर होऊ लागला, तर त्यांच्या मनावर देखील ताण येऊ शकतो. त्यामुळे आपल्या भावना किती व्यक्त करायच्या आणि कुठे थांबायचे ह्याचा विचार करावा.

ऑफिस मधील एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही असंतोषी असाल, तर चिडचिड न करता आपल्या जोडीदाराशी त्याविषयी चर्चा करा. अनेकदा तुमच्या मनस्थितीचा तुमच्या जोडीदाराला अंदाज नसतो. त्यामुळे तुमच्या चिडचिडेपणाचे कारण त्यांना समजत नाही. अनेकदा जोडीदाराला तुमच्या होणाऱ्या चिडचिडीला तेच जबाबदार आहेत असे वाटू लागते, त्यामुळे त्याच्या मनावर देखील ताण येऊ लागतो. अश्या वेळी आपल्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोलणे गरजेचे असून तुमच्या बिघडलेल्या मनस्थितीला तो किंवा ती जबाबदार नाहीत हे समजावून सांगा.

जर तुमची मनस्थिती ठीक नसेल, कामाचा ताण असह्य होत असेल, तर एकट्यानेच थोडा वेळ घालवा, आणि परिस्थितीचा शांतपणे विचार करा. तुम्हाला तुमच्या ‘स्पेस’ची गरज असल्याचे तुमच्या जोडीदाराला समजावून सांगा. गरज वाटल्यास कामावरून काही काळ रजा घ्या. विशेषतः आठवड्यातील साप्ताहिक सुट्टीमध्ये ऑफिसच्या मेल्स, ऑफिसचे इतर काम शक्यतो टाळा. आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त वेळ घालविण्याचा प्रयत्न करा.

तुमच्या मनावर ऑफिसच्या कामामुळे आलेल्या तणावासाठी तुमच्या जोडीदाराला दोष देणे टाळा. तुमचे सहजीवन सुखाचे असावे यासाठी जसे तुम्ही प्रयत्नशील असता, तसेच प्रयत्न तुमचा जोडीदार देखील करीत असतो. त्यामुळे तुमच्या वरिष्ठांच्या वर्तणुकीमुळे किंवा सहकाऱ्यांशी झालेल्या मतभेदांसाठी तुमच्या जोडीदाराला तुम्ही जबाबदार ठरवू लागल्यास याचा दूरगामी परिणाम तुमच्या दाम्पात्याजीवानावर होण्याची शक्यता असते. त्यामुळे आवश्यकता वाटल्यास आपल्या मनावरील ताण नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी काउन्सेलरची मदत घेणे योग्य ठरेल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment