‘ती ’चे विस्तारते क्षितिज


आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आज जगभरात महिलांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला जात आहेे. तिला समाजात अबला समजले जात होते पण आता सगळ्याच क्षेत्रातल्या महिलांनी कर्तबगारीची नवनवी शिखरे गाठून आपण सबला असल्याचे दाखवून दिले आहे. भारतात महिला महापौर, महिला कुलगुरू आणि महिला मुख्यमंत्री या गोष्टी काही नव्या राहिलेल्या नाहीत. भारतीय लष्करात आघाडीवर राहून लढणार्‍या तुकड्यातही महिला सामील झाल्या आहेत. रेल्वेची इंजिनेही त्या चालवत आहेत. अवकाशात झेप घेणार्‍या अंतरीक्ष प्रवाशांतही मुली चमकायला लागल्या आहेत. भारतात चांगल्या चालणार्‍या बँकांचे व्यवस्थापन महिलांकडेच आहे. अशा तिच्या अनेक क्षेत्रातल्या कर्तबगारीचा आढावा आज घेतला जात आहे.

असे असले तरीही महिलांना अभिमान वाटावा अशा तीन घटना भारतात घडल्या आहेत. या तीन घटनांच्या पार्श्‍वभूमीवर होत असलेला यंदाचा महिला दिन विशेष आहे. आपल्या लष्करात महिला दाखल झाल्या आहेत पण आजवर या देशात संरक्षण मंत्री म्हणून कोणा महिलेने काम केले नव्हते. पण यंदा निर्मला सीतारामन यांना संरक्षणमंत्री करून पंतप्रधानांनी एक महिलेला नवे क्षेत्र खुले करून दिले आहेच या नव्या संरक्षण मंत्र्यांनीही आपल्या कामाचा प्रकाश पाडून या खात्यात चांगलाच जम बसविला आहे. यावर्षी मुस्लिम महिलांच्या आयुष्यातही सरकारने नवा दिलासा निर्माण केला आहे.

या समाजात तीन वेळा तलाक हा शब्द उच्चारून पती आपल्या पत्नीला घटस्फोट देऊ शकत होता आणि त्यामुळे लक्षावधी मुस्लिम महिला अत्यंत असुरक्षित जीवन जगत होत्या. कोणत्या क्षणी आपला पती आपल्याला बेदखल करेल याचा काही नेम नाही याची काळजी करीतच त्या जगत होत्या पण सरकारने या महिलांना नवे जीवन देण्याचा निर्णय घेतला असून त्यांना महिला दिनाची चांगली भेट दिली आहे. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे यंदा फायटर जेट विमान चालवण्याच्या कामावर एक मुलीची निवड झाली आहे. आजवर अनेक मुली विमाने चालवीत होत्या पण फायटर जेट हे विमान चालवण्याची त्यांना मुभा नव्हती कारण ते विमान चालवणे फार अवघड होते. पण हे काम करायला मुलगी पुढे आली आहे आणि तिच्या पाठोपाठ इतरही अनेक मुली पुढे येत आहेत. दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार जगात महिला पायलटांची संख्या भारतात सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.

Leave a Comment