दाऊद शरण येणार ?


केन्द्र सरकारला हवा असलेला सर्वात धोकादायक गँगस्टर दाऊद इब्राहिम आता पाकिस्तानात राहून कंटाळला असून आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात तरी आपल्या मायभूमीत जाऊन रहावे आणि तिथे आपल्या वाट्याला येईल तसे आयुष्य जगावे असे त्याला वाटायला लागले आहे असे त्याच्या निकटवर्तियांनी म्हटले आहे. निकटवर्तीय म्हणजे त्याचा भाऊ इक्बाल कासकर याचे वकील श्याम केसवाणी हे असून त्यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे. अर्थात सरकारला शरण येतानाही त्याच्या अटी आहेतच. त्यानुसार आपल्या अटकेत ठेवायला त्याची काही हरकत नाही. आपल्याला ऑर्थर जेलमध्ये ठेवले जावे अशी त्याची मागणी आहे.

दाऊद शरण येण्यास तयार असल्याच्या बातम्या गेल्या काही वर्षात अधूनमधून उठत आल्या आहेत. दोन वर्षापूवीं ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनीही तसेच सांगितले होते. अर्थात दाऊद याच्या या कथित शरणागतीशी राम जेठमलानी यांचा थेट काही संबंध होता की नाही हे काही कळले नाही पण राम जेठमलानी यांची ही माहिती तेव्हा तरी खोटी ठरली. नंतर राज ठाकरे यांनीही दाऊद शरण येणार आणि त्याच्या शरणागतीचे श्रेय नरेन्द्र मोदी फुकटात मिळवणार असे म्हटले होते. अर्थात राज ठाकरे यांना दाऊद परत येणार असल्याच्या आनंदापेक्षा त्याचे श्रेय मोदींना मिळणार याचे दु:खच जास्त होत होते असे त्यांच्या निवेदनावरून कळले. दाऊद परत येणार ही माहिती त्यांना कोठून मिळाली हे काही त्यांनी सांगितले नाही.

दाऊदच्या परत येण्याची ही तिसरी आवई आहे पण तो प्रत्यक्षात परत येत नाही कारण त्याच्या येण्यात राजकारण आहे. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे सुरक्षा विषयक सल्लागार डोेवाल यांचा काही तरी वेगळा बेत आहे. कारण त्यांना पाकिस्तान आणि दाऊद या विषयाची सविस्तर माहिती आहे. तो शरण आला तरीही तो त्याच्या अटीवर शरण येणे हे सरकारच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही. तो शरण आला तर सरकारच्या अटीवर शरण आला पाहिजे आणि त्याला कसल्याही खटल्यापासून सुटका मिळता कामा नये असे सरकारला वाटत असणारच. कारण तो मुंबईतल्या मोठ्या बॉंबस्फोट मालिकेचा आरोपी आहे. या स्फोटात १२ बॉंबस्फोट झाले होते आणि १९९३ सालच्या या स्फोटात २०० पेक्षाही अधिक लोक मारले गेले होते. जखमींची संख्या तर ७०० पेक्षाही जास्त होती. अशा आरोपातला आरोपी त्याच्या अटीवर शरण येता कामा नये असे सरकारला वाटत असणारच. वाटत असले पाहिजेच.

Leave a Comment