पुतळे आणि विचार


त्रिपुरातल्या लोकांनी लेनिनवादी साम्यवादी पार्टीचा पराभव होताच तिथला लेनिनचा पुतळा पाडून टाकला आहे. या पाडकामामागे रशियातल्या काही घटनांचा संदर्भ आहे. रशियात १९८९ साली साम्यवादी राजवट संपली तेव्हा लोकांनी केवळ लेनिनच नाही तर अन्यही काही साम्यवादी नेत्यांचे पुतळे पाडले होते. आता त्रिपुरात त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. असे पुतळे पाडणे योग्य नाही आणि आपली ती परंपराही नाही पण लेनिनने जो विचार सांगितला त्या विचाराने त्रिपुरातल्या गरीब लोकांचे प्रश्‍न सुटले नाहीत म्हणून ते लेनिनचा पुतळा पाडून आपला साम्यवादी विचारावरचा राग व्यक्त करीत आहेत. हा राग केवळ त्रिपुरापुरता मर्यादित नाही. जगभरातच साम्यवादी विचार सरणी अपयशी ठरली आहे.

साम्यवादी विचार अपयशी ठरला असला तरीही त्याचा फार राग आला नसता पण या विचाराने अनेक भ्रामक कल्पना निर्माण केल्या आणि जगभरातल्या गरिबांना आपल्या तत्त्वज्ञानाने चांगले दिवस येतील असे आमिष सातत्याने दाखवले. प्रत्यक्षात साम्यवाद नावाची ही विचारसरणी गरिबांना न्यायही देत नाही आणि त्यांना समान अधिकारही देत नाही असे लक्षात आले आहे. चीन आणि रशिया या दोन देशांना साम्यवादी विचारांची काशी आणि मथुरा अथवा मक्का आणि मदिना मानले जात होते पण या दोन देशांनी ती साम्यवादी अर्थव्यवस्था टाकून दिली आणि भांडवलशाही व्यवस्थेचा स्वीकार केला. या दोन देशांनीच साम्यवादाला सोडचिठ्ठी दिलीय म्हटल्यावर जगभरातल्या काही देशातल्या साम्यवादी अर्थव्यवस्था संपल्या.

साम्यवादाचा असा पाडाव झाला असला तरीही आणि जगभरातल्या गरिबांचा या विचाराविषयी भ्रमनिरास झाला असतानाही भारतातले साम्यवादी नेते मात्र त्याच टाकावू आणि कालबाह्य अशास्त्रीय विचारांना चिकटून बसले आहेत आणि सनातनी लोकांप्रमाणे त्याच साम्यवादी विचारांच्या पोथ्यांची पारायणे करीत आहेत. साम्यवादात अपेक्षित असलेली अनेक भाकिते चुकीची आणि गैरलागू ठरली आहेत पण हे लोक त्यांनाच कुरवाळून बसले आहेत. साम्यवादाची तत्त्वे काही वेगळी असतात असे म्हणावे तर तसा अनुभवही येत नाही. डाव्या आघाडीने बंगालमध्ये ३५ वर्षे राज्य केले पण बंगालची गरिबी हटली नाही. उलट बंगाल हे देशातले एक गरीब राज्य आहे. मग ३५ वर्षे साम्यवादी राजवट असूनही जर राज्य गरीब रहात असेल तर असा हा साम्यवादी विचार फेकून दिलेला काय वाईट?

Leave a Comment