गूळ शर्करा


गूळ म्हणजे गूळ आणि शर्करा म्हणजे साखर. आपण एक गूळ तरी खाऊ शकतो किंवा साखर तरी खाऊ शकतो. पण या दोन्हींचा मिलाप करून सोलापूर जिल्ह्यातल्या एका शेतकरी उद्योजकाने गूळ शर्करा तयार केली आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या कुरूल या गावात ही साखर तयार केली जाते. या साखरेची काही वैशिष्ट्ये आहेत. ती तयार करणारे अमर आणि प्रविण लांडे हे बंधू मुळात २०१० सालपासून सेंेद्रीय गूळ तयार करीत आले आहेत. लोकांना सेंद्रीय खाद्यपदार्थांचे महत्त्व लक्षात यायला लागले असल्याने त्यांच्याकडून अशा पदार्थांची आणि शेतीमालाची मागणी होणार हे लक्षात घेऊन या लांडे बंधूंनी सेंद्रीय गूळ तयार करायला सुरूवात केली. हा गूळ तयार करताना कसलीही रसायने वापरलेली नाहीत हे त्याचे वैशिष्ट्य आहे.

हा विषमुक्त गूळ विकताना त्यांना काकवीही लागते हे लक्षात यायला लागले. तशी काकवी तयार करणे हे काही फार वेगळे तंत्र नाही. गूळ तयार करण्याच्या प्रक्रियेच्या एका टप्प्यावर काकवी तयार होत असते. तेव्हा या दोघांनी सेंद्रीय काकवीही विकायला सुरूवात केली. एके दिवशी त्यांनी साठवलेल्या गूळावर काही प्रक्रिया करण्यास प्रारंभ केला असता त्या गुळापासून बारीक साखर तयार होत असल्याचे लक्षात आले. त्यांनी तीच प्रक्रिया नंतर शास्त्रशुद्धरीत्या केली आणि आपली ही गूळ शर्करा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवली. प्रयोगशाळांनी ही साखर खाण्यास योग्य आणि सेंद्रीय असल्याचे प्रमाणपत्र या कंपनीला दिले.

या कंपनीचे नाव जलकमल कंपनी असे आहे. सतत कसले ना कसले प्रयोग करण्याच्या नादात त्यांना सेेंद्रीय गुळापासून विषमुक्त, रसायनमुक्त आणि सेंद्रीय साखर करण्यात यश आले. ही साखर आता ऐंशी रुपये प्रति किलो या भावाने विकली जात आहे. या साखरेचे आणि सेेंद्रीय गुळाचेेही आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे या दोन्ही पदार्थात ग्लुकोजचे प्रमाण केवळ एक टक्का एवढेच आहे. सध्या मधुमेहाच्या बाबतीत अनेक प्रकारची माहिती सोशल मीडियातून प्रसारित होत असते. तिच्यानुसार मधुमेहाच्या रुग्णाला अशी ग्लुकोज कमी असलेली साखर चालते. पण अर्थातच या संशोधनाला अधिकृत मान्यता नसल्यामुळे लांडे बंधूंना तशी जाहीरात करता येत नाही. या कारखान्यात गूळ आणि साखर सेंद्रीय तयार होते पण त्यासाठी वापरला जाणारा ऊस हा सेंद्रीय नसतो. म्हणून लांडे बंधूंनी आपल्या परिसरातल्या शेतकर्‍यांना सेंद्रीय ऊस पिकवण्यास प्रोत्साहन देण्यास सुरूवात केली आहे.

Leave a Comment