लाल गडात काय घडले?


त्रिपुरात माकपाचा पराभव करून भाजपाने मोठा इतिहास घडवला आहे. कारण हा केवळ एका राज्यातला सत्तांतराचा प्रकार नाही. हा डाव्या आणि उजव्या शक्तीतला पहिला सामना होता. भाजपा हा उजवा पक्ष आहे आणि माकपा हा डावा. देशातली ही दोन विचारांची टोके आहेत. अन्य कोणतेही पक्ष डावे आणि उजवे असे कोणतेही टोक गाठू शकतात आणि या दोन्ही पक्षांशी कधीही सोयीनुसार युती करू शकतात पण माकपा आणि भाजपा कधी हात मिळवणी करीत नाही. हे देशातले दोन वैचारिक पर्याय आहेत. एक काळ असा होता की भाजपा हा चार राज्यांतच मर्यादित राहणारा पक्ष होता तर माकपा हा तीन राज्यात होता. या दोघात कोणता पक्ष देशव्यापी प्रभाव निर्माण करतोय याकडे सर्वांचे लक्ष होते पण हे दोन पक्ष कधीच समोरासमोर आले नव्हते. ते त्रिपुरात आले आणि डाव्यांना पराभूत व्हावे लागले.

ही निवडणूक केवळ त्रिपुरातल्याच नाही तर पूर्ण देशातल्या डाव्या विचारांच्या अस्ताची सुरूवात आहे तर उजव्या विचाराच्या उदयाची निशाणी आहे. त्रिपुरात तर डाव्या पक्षाने फार प्रगती केल्याचे म्हटले जात होते पण ही प्रगती कशी तकलादू आहे हे भाजपाने तिथल्या लोकांना दाखवून दिले. डाव्या पक्षाच्या हातात २५ वर्षे सत्ता होती पण मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्याच घरच्या लोकांना दोन किलोमीटरवरून पाणी आणावे लागत होते. जनता अनेक गैरसोयींनी त्रस्त झाली होती. लोकांना डावी राजवट नको होती पण त्यासाठी विरोधी कॉंग्रेसने आक्रमक रूप घ्यायला हवे होते. तेच कॉंग्रेसने टाळले. त्यामुळे जनतेने भाजपाला विरोधी शक्ती म्हणून स्वीकारले आणि भाजपाने शिस्तीत आक्रमक प्रचार केल्याने त्याला सत्ता दिली.

कॉंग्रेस राष्ट्रीय राजकारणाचा विचार करून नेहमी डाव्यांना चुचकारत असे आणि त्यामुळे त्रिपुरातल्या डाव्या राजवटीला कधी आव्हान देत नसेे. पक्षाच्या या धोरणावरून कॉंग्रेस पक्षातच नाराजी होती. त्यामुळे या निवडणुकीत काही कॉंग्रेस जनांनी भाजपाला मदत केली. दुसरी गोष्ट म्हणजे माकपा नेते गाफील राहिले. आपली २५ वर्षांची राजवट कोणीच संपवू शकत नाही अशा कल्पनेत ते राहिले. मात्र माकपाचे नेते बहुसंख्येेने सत्तरीच्या पुढची आहे. तिला देशात उदयाला येत असलेल्या तरुण पिढीच्या भावना समजत नाहीत. ते या पिढीला गृहित धरतात आणि जनतेला काही समजत नाही असे मानून मनमानी राजकारण करतात. त्याचा फटका तिथे माकपाला बसला आहे.

Leave a Comment