भारतीय महिला कुस्तिगीर


भारतात जन्म घेऊन परदेशात नाव काढणार्‍या अनेक खेळाडूंची आपल्या देशात परंपरा आहे. सानिया मिर्झा हे अशा खेळाडूंचे एक उदाहरण आहे. ती जन्मली भारतात पण तिने खेळाडू म्हणून नाव कमावल्यानंतर तिचा विवाह पाकिस्तानी क्रिकेटपटूशी झाला. ती राहते पाकिस्तानात पण खेळते ती मात्र भारताकडून. आता ऑस्ट्रेलियाच्या महिला कुस्तिगीरांच्या चमूत निवड झालेल्या रूपिंदर कौर हिचा प्रकार मात्र वेगळा आहे. ती भारतात जन्मली आणि तिने कुस्तिगीर म्हणून येथेच नाव कमावले. आता ती ऑस्ट्रेलियात आहे मात्र ती भारताकडून खेळणार नाही तर ती ऑस्ट्रेलियाच्या संघातून खेळेल. रूपिंदर कौर हिचा जन्म पंजाबच्या तर्ण तारण या गावात झाला आणि तिने हरीका पट्टण येथे सुरूवातीला मैदान गाजवले.

तर्ण तारण येथे तिने सातवीत असताना ज्युडोत पुरस्कार मिळवला होता पण हळुहळु तिला कुस्तीत रस वाटायला लागला. तिने अकरावीत असताना पहिली कुस्ती जिंकली. तिचे कौशल्य सर्वांना दिसत होते पण मुलीला कुस्तीत करीयर करायला मदत करण्यास कोणी तयार नव्हते. तिच्या वडिलांनी मात्र तिला प्रोत्साहन दिले. तिची आजी आणि आजोबा हेही तिच्या मागे उभे राहिले. कुस्ती खेळायला सुरूवात केल्यानंतरच्या दुसर्‍याच वर्षी तिने राष्ट्रीय खेळात भाग घेतला. हैदराबाद येेथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धात तिने रोप्यपदक मिळवले तर तुर्कस्तानात झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

२००७ साली उच्च शिक्षणासाठी म्हणून ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर ती तिकडचीच झाली आणि तिला कुलदीप बस्सी हे प्रशिक्षक मिळाले. तिने ऑस्ट्रेलियातल्या राष्ट्रीय स्पर्धेत अजिंक्यपद मिळवल्याने त्या देशाच्या निवड समितीचे तिच्याकडे लक्ष वेधले गेले. तिने २०१४ साली जोहान्सबर्ग येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही एक पदक मिळवले आहे. आता गोल्ड कोस्ट येथे ३ एप्रिल पासून होणार्‍या राष्ट्रकुल स्पर्धेच्या ऑस्ट्रेलियाच्या संघात तिची निवड झाली आहे. या संघात आठ जण असून त्यातल्या तिघी महिला आहेत. तिला राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळण्याची महात्वाकांक्षा आहे. पण, तसे करताना तिला कदाचित आपल्याच देशाच्या म्हणजे भारताच्याच महिला कुस्तिगीराशी सामना करावा लागेल. तसे झाल्यास दोन भारतीय कन्यांचा सामना प्रेक्षकांसाठी मोठाच प्रेक्षणीय ठरेल. तिला एक मुलगीही आहे आणि आपली मुलगी हे आपले प्रेरणास्थान असल्याचे ती अभिमानाने सांगत असते.

Leave a Comment